mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती; अकोला-बुलढाण्यात सिंचनाचे चित्र पालटणार | Wainganga Nalganga river linking project

शेअर करा :

Wainganga Nalganga river linking project : वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्प अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असून अकोला व बुलढाण्यासह विदर्भातील आठ जिल्ह्यांचे सिंचनाचे चित्र बदलणार आहे. प्रत्यक्ष काम वर्षभरात सुरू होण्याची शक्यता.

Wainganga Nalganga river linking project

अकोला : सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या विदर्भातील जिल्ह्यांचे संपूर्ण चित्र बदलण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्प सध्या विविध प्रशासकीय व वैधानिक मान्यतांच्या अंतिम टप्प्यात आहे. चालू वर्षातच या सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे अकोल्यासह वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंचनाचे चित्र पूर्णतः पालटणार असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🔴 Update: प्रकल्पाला आता राज्य अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असून नवीन अपडेट वाचा

Wainganga Nalganga River Linking Project : विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात अधिकृत मान्यता देण्यात आली असून या निर्णयामुळे अकोला, बुलढाणा सहित आठ जिल्ह्यांतील सिंचन व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय घोषणेद्वारे प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय जाहीर केला.

या प्रकल्पास २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. सुमारे ९४ हजार ९१२ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मे. सिएन्सीस टेक लिमिटेड या कंपनीने तयार केला असून तो सध्या शासनाकडे प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला अग्रक्रम दिला असून वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जात आहे.

येत्या काही महिन्यांत प्रकल्पासाठी वन विभागाची मान्यता, पर्यावरण मंजुरी तसेच केंद्रीय जल आयोगाकडे (CWC) सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रकल्पातील संभाव्य विलंब टाळता येणार असून, वर्षभरातच प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आठ जिल्ह्यांना थेट लाभ

वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द (इंदिरा सागर) राष्ट्रीय प्रकल्पातून तापी उप-खोऱ्यातील नळगंगा नदीकडे १,८०४ दलघमी पाणी वळविण्यात येणार आहे. या पाण्यामुळे भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा या ८ जिल्ह्यांमधील सुमारे ४ लाख ४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासोबतच औद्योगिक आणि घरगुती वापरासाठीही पाण्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

पाणी वळविण्यासाठी ३८८.२८ किलोमीटर लांबीचा नदीजोड कालवा उभारण्यात येणार असून, पावसाळ्यातील सुमारे ७० दिवसांच्या कालावधीत वैनगंगेतील अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे नळगंगेकडे नेण्यात येणार आहे. या कालव्यात १३ बोगदे (एकूण लांबी २३.७७ कि.मी.) असतील, तर उर्वरित २९२ कि.मी. कालवा खुल्या स्वरूपाचा राहणार आहे. यासाठी ८ ठिकाणी पंपांच्या साहाय्याने पाणी उचलले जाणार आहे.

साठवण तलावांची मोठी योजना

या नदीजोड प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारा पाणीसाठा प्रामुख्याने रब्बी हंगामासाठी वापरण्यात येणार असून त्यासाठी ५० पाणी साठवण तलावांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १८ तलाव सध्या अस्तित्वात असून त्यातील १० तलावांची उंची वाढवावी लागणार आहे. उर्वरित ३२ तलाव नव्याने बांधण्यात येणार आहेत. तसेच वर्धा नदीवरील निम्न वर्धा प्रकल्प, काटेपूर्णा नदीवरील काटेपूर्णा व नळगंगा प्रकल्प हे साठवण तलाव म्हणून वापरले जाणार आहेत.

🔗 विदर्भातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

घरगुती व औद्योगिक पाण्याची तरतूद

मुख्य कालव्यालगतच्या गावे, शहरे व औद्योगिक क्षेत्रांच्या गरजांसाठी घरगुती वापरासाठी ८० दलघमी, तर औद्योगिक वापरासाठी १३९ दलघमी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे अडचणीत असलेल्या विदर्भातील जिल्ह्यांचे चित्र पालटण्याची क्षमता या प्रकल्पात असून, सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्यास चालू वर्षातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको