Akola GMC nurses protest : अकोला जीएमसीमध्ये आमदार साजिद पठाण आणि परिचारिका वाद चिघळला; दिलगिरीनंतरही परिचारिकांनी सायंकाळी कामबंद मागे घेतले. दरम्यान दिवसभर रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला.
जीएमसीमध्ये परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू; रुग्णसेवा प्रभावित
अकोला : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि सर्वोपचार रुग्णालयात आमदार साजिद पठाण आणि परिचारिका यांच्यातील वाद चिघळला असून शनिवारी सकाळपासून परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आमदारांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही ती माफी नसून कर्मचाऱ्यांना दिलेला धमकीवजा इशारा असल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. सायंकाळनंतर परिचारीकांनी आंदोलन मागे घेतल्याने रुग्णसेवा पुर्ववत सुरू झाली.
रुग्णालय भेटीदरम्यान वादाची ठिणगी
अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद पठाण यांनी गुरुवारी (१२ तारखेला) सर्वोपचार रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत खडेबोल सुनावले. दरम्यान, परिचारिकांशी संवाद साधताना एकेरी भाषेचा वापर केल्याने मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप परिचारिकांकडून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जीएमसीमध्ये परिचारिकांनी आमदारांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जाहीर माफीची मागणी केली होती. माफी न मिळाल्यास शनिवारीपासून तीव्र कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. यासंदर्भात परिचारिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सोनुने यांना निवेदन दिले आहे.
“माफीनाम्याशिवाय आंदोलन मागे नाही”
आमदारांनी शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यामध्ये खरी माफी नसून कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा असल्याचा आरोप परिचारिकांनी माध्यमांशी बोलताना केला. आमदारांनी प्रत्यक्ष भेटून स्पष्ट माफीनामा सादर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
रुग्णसेवेवर परिणाम
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली असून परिस्थिती लवकर सुरळीत होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा याचा थेट परिणाम रुग्णांवर होण्याची शक्यता आहे.
आमदार साजिद पठाण यांची दिलगिरी
परिचारिकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार साजिद पठाण यांनी दिलगिरी व्यक्त करत सांगितले की, जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने कर्मचाऱ्यांना जाब विचारला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाला दुखावले गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, भविष्यात गरजू रुग्णांना योग्य सेवा मिळाली नाही तर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता
🔗 अकोल्यासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी 👉 विदर्भ या कॅटेगरीला अवश्य भेट द्या.