mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अकोल्यात विद्यार्थिनी छेडछाड प्रकरणातील आरोपी अटकेत; 300 CCTV तपासून पोलिसांची मोठी कारवाई | Akola student harassment accused arrested

शेअर करा :

Akola student harassment accused arrested : अकोला शहरातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणात पोलिसांनी व्यापक तपास करत आरोपी विवेक उर्फ विकी खांडेकर याला अटक केली. 300 हून अधिक CCTV फुटेज तपासून पोलिसांची यशस्वी कारवाई.

Akola molestation CCTV incident

अकोला : अकोला शहरातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणात अकोला पोलिसांनी जलद व समन्वयित तपास करत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीतील तोष्णीवाल ले-आऊट परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी व्यापक तपास मोहीम राबवत आरोपीला ताब्यात घेतले.

👉 यापूर्वी घडलेल्या घटनेची सविस्तर बातमी वाचा :
अकोल्यातील जवाहर नगरमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड; सीसी कॅमेऱ्यात घटना कैद

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास एक विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना अज्ञात मोपेड वाहनचालकाने तिचा पाठलाग केला. आरोपीने विद्यार्थिनीचे ओळखपत्र (आय-कार्ड) जबरदस्तीने ओढून तिची छेडछाड केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. अकोला शहरात शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यांमधून विद्यार्थी येत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Akola student harassment accused arrested

घटनेनंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले. त्यानुसार गुन्ह्याचा समांतर व सखोल तपास सुरू करण्यात आला.

३०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

तपासादरम्यान संशयित आरोपीचे वर्णन तसेच त्याने वापरलेल्या मोटारसायकलीचा रंग, मॉडेल व कंपनी याबाबत माहिती निश्चित करण्यात आली. त्याआधारे सुमारे २०० हून अधिक मोटारसायकलींची तपासणी करण्यात आली. तसेच परिसरातील व आसपासच्या भागातील ३०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीचा तपासात प्रभावी वापर करण्यात आला.

👉 अकोला शहरातील गुन्हेगारीविषयी अधिक बातम्या वाचा :
अकोला क्राईम न्यूज

दरम्यान, अशाच प्रकारची घटना पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीतही घडल्याची माहिती प्राप्त झाली होती. आरोपीने वेगळे वाहन वापरल्याचे समोर आल्यानंतर डाबकी रोड पोलिसांच्या मदतीने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. सातत्यपूर्ण शोधमोहीम व अचूक माहितीच्या आधारे अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

संबंधित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कलम ७४, ७५(२), ७८ बीएनएस नुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक उर्फ विकी दिलीपराव खांडेकर (रा. वानखेडे नगर, डाबकी रोड, अकोला) यास अटक करण्यात आली आहे.

👉 राज्यातील इतर बातम्या वाचा : महाराष्ट्र बातम्या

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव, हेड कॉन्स्टेबल शेख वसीम, महेंद्र मलिये, रवी खंदारे, किशोर सोनोने, अब्दुल माजिद तसेच पोलीस ठाणे डाबकी रोडचे पोलीस निरीक्षक दिपक रामकृष्ण कोळी, पोलीस उपनिरीक्षक अनिल राजुसिंग चव्हाण, एएसआय दिपक प्रल्हादराव तायडे, हेड कॉन्स्टेबल प्रविण पुरुषोत्तम इंगळे, उमेश शालिकराम पाटील, उमेश मनिकलाल सुगंधी, एनपीसी राजेश जटाशंकर ठाकूर, मंगेश नामदेव गिते तसेच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पीएसआय शामली निकम व पीसी शक्ति कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले.

या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत अकोला पोलीस दलाची कठोर भूमिका अधोरेखित झाली असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी तात्काळ अकोला पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको