Akola Mayor Reservation: अकोला महानगरपालिकेत महिला ओबीसी महापौरपद निश्चित झाले असून भाजपकडे 13 महिला दावेदारांची नावे चर्चेत आहेत. महापौरपदासाठी अंतिम निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे.


अकोला : महानगरपालिकेत यावेळी महिला ओबीसी (इतर मागासवर्गीय) महापौर होणार हे निश्चित झाले असून, या निर्णयामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षणानुसार महापौरपद महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी गुरुवारी अधिकृतपणे आरक्षण जाहीर करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. या प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांचेही विशेष लक्ष लागून होते. दरम्यान, अकोला महानगरपालिकेसाठी महिला ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद निश्चित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपकडे सध्या एकूण 13 ओबीसी महिला नगरसेविका व नेत्या असून, त्यामुळे भाजपची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे. महापौरपदासाठी भाजपकडून वैशालीताई शेळके, पल्लवी मोरे, योगिता पावसाळे, मंजुषाताई शेळके, शिल्पाताई वरोकार, रश्मी अवचार, निकिता देशमुख, अंधारेताई, शारदाताई खेडकर, नीतू जगताप, माधुरी क्षीरसागर, काकडताई आणि ॲड. कल्पनाताई गोटे ही नावे चर्चेत आहेत.
या 13 दावेदारांपैकी नेमकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत चर्चा, वरिष्ठ नेत्यांची भूमिका तसेच सामाजिक व राजकीय समीकरणांवर अंतिम निर्णय अवलंबून राहणार असल्याचे चित्र आहे.


