Akole tourism development fund : अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी भागातील विकासकामांना गती देण्यासाठी सोलार योजना, शाळांमध्ये सुविधा व अकोले पर्यटन विकासासाठी वाढीव निधी देण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.


शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने उपाययोजना कराव्यात. अकोले तालुक्यातील पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम (२०२६–२०२७) चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्याचा प्रारूप आराखडा सादर केला. त्यावर चर्चा करताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी आदिवासी पाड्यांवरील वीजपुरवठ्याची अडचण लक्षात घेऊन तेथे सोलार हायमास्ट व सोलार स्ट्रीट लाईट बसविण्याचे निर्देश दिले. पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी सोलार पंप बसविण्यावर भर द्यावा, तसेच आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे उभारावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अकोले तालुका निसर्गसंपन्न असल्याने पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचित केले. यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या कामाला गती देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र उपकार्यालय सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
प्रकल्प अधिकारी (राजूर) यांनी आठवड्यातून किमान एक दिवस व आवश्यक कर्मचारी या उपकार्यालयात उपस्थित राहून कामकाज पाहावे, जेणेकरून अनुसूचित जमातीचे लाभार्थी, लोकप्रतिनिधी व संबंधित शासकीय यंत्रणांना संपर्क साधणे सुलभ होईल, अशा सूचनाही देण्यात आल्या. याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
🔗 अहिल्यानगर व महाराष्ट्रातील इतर ताज्या राजकीय व विकासात्मक बातम्या येथे वाचा.
बैठकीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मार्गदर्शन करताना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एका शासकीय आश्रमशाळेचे ‘मॉडेल स्कूल’मध्ये रूपांतर करण्याचे निर्देश दिले. हे मॉडेल स्कूल पालकमंत्र्यांनी दत्तक घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
तसेच आदिवासी महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकता वाढवणे, ‘राणी दुर्गावती महिला सबलीकरण’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि आदिवासी व ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना’ प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मंत्री डॉ. उईके यांनी दिले.


