Amravati News: राज्यभरात विविध ठिकाणी राजकीय युती-आघाड्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू असताना, अमरावती महापालिका निवडणुकीत एक अनपेक्षित राजकीय चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची युती होणे जवळपास अशक्य मानले जात होते. मात्र अमरावती शहरातील जवाहर गेट-बुधवारा प्रभागात हेच राजकीय अघटित प्रत्यक्षात घडले आहे.


अमरावती : राज्यभरात विविध ठिकाणी राजकीय युती-आघाड्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू असताना, अमरावती महापालिका निवडणुकीत एक अनपेक्षित राजकीय चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची युती होणे जवळपास अशक्य मानले जात होते. मात्र अमरावती शहरातील जवाहर गेट-बुधवारा प्रभागात हेच राजकीय अघटित प्रत्यक्षात घडले आहे.
या प्रभागात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात थेट युती झाली असून, या निर्णयामुळे संपूर्ण शहरात राजकीय चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, अमरावतीतील बहुतांश प्रभागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवत असताना, केवळ या एका प्रभागात शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) युती झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
हरमकर दाम्पत्य एकत्र निवडणूक रिंगणात
जवाहर गेट-बुधवारा प्रभागातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक प्रवीण हरमकर आणि त्यांची पत्नी विशाखा हरमकर हे दोघे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मशाल या निवडणूक चिन्हावर हे दाम्पत्य प्रचारात असून, विकास आणि समाजकार्य हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
युतीमागील पार्श्वभूमी काय?
या अनोख्या युतीमागची भूमिका स्पष्ट करताना प्रवीण हरमकर यांनी ‘ईटीव्ही भारत’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या परिसरात काँग्रेस-शिवसेना युती अपेक्षित होती. मात्र त्यासाठी आधीपासून नियोजन आवश्यक होते. त्यांच्या प्रभागात काँग्रेसचे उमेदवार तब्बल आठ महिने आधीच निश्चित झाले होते.
या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि आमदार संजय खोडके यांच्याशी माझे वैयक्तिक तसेच राजकीय संबंध आहेत. आम्ही कायम एकत्र काम केले आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती आणि मतदारांचा विचार करूनच ही युती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांच्याशी चर्चा करून ही भूमिका पक्षाकडे मांडण्यात आली. वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिल्यानंतरच पुढील पाऊल टाकण्यात आले, असे हरमकर यांनी स्पष्ट केले.
“मतदारच अंतिम निकाल देणार”
माझी पत्नी विशाखा समाजकार्य शाखेतील शिक्षण घेतलेली असून ती सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. महिला आणि पुरुष असे स्वतंत्र गट न करता आम्ही दोघे मिळून प्रभागासाठी काम करू शकतो. महिलांमध्ये ती काम करेल आणि पुरुषांमध्ये मी काम करेन. दोघे एकत्र काम केल्यास विकासाला अधिक गती मिळेल, या विश्वासातून आम्ही दोघेही निवडणुकीत उतरलो आहोत, असे प्रवीण हरमकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, मोठ्या नेत्यांच्या घरात पती-पत्नी आमदार-खासदार होऊ शकतात, मग आम्ही तर सामान्य कार्यकर्ते आहोत. शेवटी निवडणुकीचा निर्णय मतदारच घेतो. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. जनतेने आम्हाला तपासले आहे. मतदानाच्या दिवशी मतदार योग्य बटन दाबतील आणि तेव्हाच खरी भूमिका स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“समाजकारणालाच प्राधान्य”
विशाखा हरमकर यांनी सांगितले की, प्रवीण हरमकर हे 2007 आणि 2012 या कालावधीत सलग दहा वर्ष या भागाचे नगरसेवक होते. 2017 च्या निवडणुकीत गटकारस्थानामुळे त्यांचा पराभव झाला. आता या निवडणुकीत ते दाम्पत्य म्हणून पुन्हा जनतेसमोर उभे राहिले आहेत.
मशाल या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचा सल्ला दिला होता. आम्हीही त्याच विचारातून समाजकारणासाठीच राजकारणात आलो आहोत, असे विशाखा हरमकर यांनी स्पष्ट केले.


