Amrit Bharat Express Panvel Alipurduar : मुंबई–भुसावळ मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पनवेल ते अलीपूरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस २३ फेब्रुवारीपासून नियमित धावणार असून ११ जनरल डब्यांमुळे आरक्षणाशिवाय प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.


जळगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई–भुसावळ मार्गावर वाढत्या प्रवासी गर्दीमुळे स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत पनवेल ते अलीपूरद्वार दरम्यान धावणारी ‘अमृत भारत साप्ताहिक एक्स्प्रेस’ २३ फेब्रुवारीपासून नियमित सेवेत दाखल होत आहे. विशेष म्हणजे या गाडीत तब्बल ११ सामान्य द्वितीय श्रेणी (जनरल) डबे असणार असल्याने जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
👉 “रेल्वे संबंधित इतर बातम्या वाचा” : खंडवा–अकोला गेज परिवर्तन प्रकल्पाला वेग; तापी नदीवरील पूल अंतिम टप्प्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या गाडीची नियमित सेवा सुरू होत असून गाडी क्रमांक ११०३१ पनवेल–अलीपूरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस दर सोमवारी सकाळी ११.५० वाजता पनवेल स्थानकावरून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता अलीपूरद्वार जंक्शन येथे पोहोचणार आहे. परतीची ११०३२ अलीपूरद्वार–पनवेल एक्स्प्रेस २६ फेब्रुवारीपासून दर गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पनवेल येथे दाखल होईल.
या स्थानकांवर थांबा
ही साप्ताहिक एक्स्प्रेस दोन्ही दिशेने कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, बरगढ, प्रयागराज छिवकी, मेजा रोड, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, खगडिया, मानसी, नौगछिया, कटिहार, बरसोई, किशनगंज, अलुआबारी रोड, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी, बिन्नागुडी आणि हासीमारा या स्थानकांवर थांबणार आहे.
अनारक्षीत प्रवासही होणार सुकर
या गाडीत आठ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, एक पॅन्ट्री कार तसेच दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे. जनरल डब्यांची संख्या जास्त असल्याने आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः गर्दीच्या हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे. अमृत भारत श्रेणीतील गाड्यांमध्ये आधुनिक सुविधा, सुधारित आसन व्यवस्था आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. गाडी क्रमांक ११०३१ साठी आरक्षण १९ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.
👉 “जळगावसह परिसरातील इतर महत्त्वाच्या बातम्या” – महाराष्ट्र
या विशेष गाड्यांना मुदतवाढ
दरम्यान, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून भुसावळ–दादर मार्गावरील विशेष रेल्वे सेवांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ–दादर (०९०५०) या साप्ताहिक विशेष गाड्या दर शुक्रवारी धावणार असून त्यांचा कालावधी २७ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच दादर–भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) या त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणार असून त्यांची सेवा २८ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबार मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


