mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Chhatrapati Sambhajinagar Gas Price Protest

शेअर करा :

Chhatrapati Sambhajinagar Gas Price Protest : छत्रपती संभाजीनगर येथे गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. किरण पाटील डोणगावकर आणि शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar Gas Price Protest

छत्रपती संभाजीनगर : घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी सरकार हाय हाय”, “होश मे आओ मोदी सरकार” अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत आहे. सध्या अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केल्याने घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९२० रुपयांपेक्षा अधिक, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच व्यावसायिक गॅस वितरणावर निर्बंध आल्यामुळे हॉटेल, खानावळ चालक तसेच लघु उद्योजकांना त्याचा फटका बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी वाढविण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. वाढलेल्या गॅस दरांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याने गॅसच्या किंमती तात्काळ कमी कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी गॅस संदर्भातील प्रश्नांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. जालना येथे गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले, तर वाशिममध्ये गॅस बुकिंगमधील तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको