mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

राज्यात गॅस सिलेंडर काळाबाजारावर धडक कारवाई; मुंबई, जालना, अकोल्यात सिलेंडर जप्त | Domestic LPG Cylinder Black Market

शेअर करा :

Domestic LPG Cylinder Black Market : घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात राज्यभर कारवाई सुरू. मुंबई, जालना आणि अकोला येथे पुरवठा विभागाने छापे टाकून मोठ्या प्रमाणात सिलेंडर जप्त केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई.

Domestic LPG Cylinder Black Market
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने धडक कारवाया सुरू केल्या आहेत. मुंबई, जालना आणि अकोला येथे पुरवठा विभागाच्या पथकांनी छापे टाकून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

👉 राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

मुंबईत मोठा साठा जप्त

मुंबईतील वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई केली. वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात अवैध साठेबाजी करून चढ्या दराने सिलेंडर विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Domestic LPG Cylinder Black Market
या कारवाईत एचपी गॅस कंपनीचे ५ किलोचे सहा भरलेले व ५८ रिकामे सिलेंडर, तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले व १२ किलोचे १९ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय १२, ४ आणि २ किलोचे २५ रिकामे सिलेंडरही आढळून आले.
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

जालन्यात ३० घरगुती सिलेंडर जप्त

जालना शहरातही घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने जिल्हा पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून ३० घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले.

Domestic LPG Cylinder Black Market
उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार छाया पवार, तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव, पुरवठा निरीक्षक दीपक दंडाईत, प्रियंका टाशे व दिलीप मुळे यांनी ही कारवाई केली.
अंबड चौफुली, छत्रपती संभाजीनगर चौक आणि भोकरदन नाका परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट व इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळल्याने सिलेंडर जप्त करण्यात आले. संबंधित व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

अकोल्यातही कारवाई; नऊ पथके गठीत

अकोला जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तर व तालुका स्तरावर एकूण नऊ पथके गठीत करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ३४ गॅस एजन्सींची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पथकाने २५ व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली असता सहा ठिकाणी कारवाई करून आठ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यनावार यांनी दिली.

👉 देशातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : भारत

प्रशासनाचा इशारा

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असून अशा प्रकारे गैरवापर आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस एजन्सीसमोर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 बिजनेसशी निगडीत महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा : बिझनेस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको