Harshvardhan Sapkal protest Jalna : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात भाजपकडून आंदोलन; काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.


जालना : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांनी जालन्यातील काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


भाजप कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या छायाचित्राचा निषेध करत विरोध दर्शविला.
दरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली.
उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याच्या वक्तव्यावरून राज्यभरात विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटत असून त्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता
🔗 या प्रकरणाशी संबंधित आधीची बातमी वाचा
👉 छत्रपती शिवाजी महाराजांवरील कथित वक्तव्य प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
🔗महाराष्ट्रातील इतर राजकीय घडामोडी वाचण्यासाठी राजकारण कॅटेगरीला भेट द्या.


