Illegal abortion drugs seizure Washim : वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गर्भपाताशी संबंधित औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री आणि कामोत्तेजक औषधांचा अवैध साठा जप्त.


वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) वाशिम कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने अनसिंग येथे मोठी धडक कारवाई करत गर्भपाताशी संबंधित औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री आणि कामोत्तेजक स्वरूपाच्या ऍलोपॅथिक औषधांचा अवैध साठा उघडकीस आणला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात औषधे जप्त करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त गोपनीय माहितीनुसार मे. आई मेडिकल स्टोअर, अनसिंग येथे अन्न व औषध प्रशासनाने डमी ग्राहक पाठवून कारवाई केली. संबंधित ग्राहकाने गर्भपातासंदर्भातील औषधांची मागणी केल्यानंतर कोणतेही वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन न तपासता औषधांची विक्री करण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी औषध विक्रेता किशोर नामदेव डोके यास रंगेहात पकडण्यात आले.
यानंतर औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी औषध आस्थापनेची सविस्तर तपासणी केली असता आवश्यक खरेदी-विक्री नोंदी, बिल, स्टॉक रजिस्टर तसेच अन्य कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान गर्भपाताशी संबंधित औषधांचा साठा आढळून आला असून पंचनामा करून तो जप्त करण्यात आला. संबंधित औषधांचे नमुने शासकीय औषध विश्लेषण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले की, गर्भपात औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री तसेच बेकायदेशीर औषध साठा हे सार्वजनिक आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेस गंभीर धोका निर्माण करणारे प्रकार असून संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियमासह लागू कायद्यांनुसार कठोर दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे. स्त्री भ्रूण हत्या, लिंगनिवड आणि अवैध औषध व्यवहारांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्यात आले असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला.
घरातूनही आढळला कामोत्तेजक औषधांचा अवैध साठा
अनसिंग येथील कारवाईनंतर संशयाच्या आधारे सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानी तपासणी केली. या तपासणीत कामोत्तेजक स्वरूपाच्या ऍलोपॅथिक औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
या साठ्यामध्ये एकूण २५३ स्ट्रिप जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजित किंमत सुमारे २० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही वैध औषध विक्री परवान्याशिवाय हा साठा ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तो जप्त करण्यात आला. नमुने पुढील तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
प्रशासनाने अशा बेकायदेशीर औषध विक्री व साठेबाजीविरुद्ध कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता
🔗 वाशिमसह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी 👉 विदर्भ या कॅटेगरीला अवश्य भेट द्या.


