Lonar Accident News : लोणार तालुक्यात ॲपे व चारचाकी वाहनाच्या अपघातात एका मजूर महिलेचा मृत्यू, काही महिला गंभीर जखमी. सकाळी शेतात जात असताना दुर्घटना.


लोणार (जि. बुलढाणा) : लोणार तालुक्यात शेतात कामासाठी जात असताना ॲपे आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन एका मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात काही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सरस्वती–मातमळ गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर हिवराखंडकडे जाणाऱ्या MH 43 AF 5821 क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने MH 20 R 2211 क्रमांकाच्या ॲपेला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ॲपेचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात ॲपेमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, लोणार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलांना रुग्णवाहिकेद्वारे लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


