mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

महाराष्ट्र-वाकायामा सहकार्य अधिक दृढ होणार | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा | Maharashtra Wakayama cooperation

शेअर करा :

Maharashtra Wakayama cooperation : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानी शिष्टमंडळाशी चर्चा केली. तंत्रज्ञान, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर भर.

Maharashtra Wakayama cooperation
मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबत आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील हॉटेल ताजमहल येथे जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी तसेच शासन, विधिमंडळ, सांस्कृतिक, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख राजधानी असून महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांत ‘सिस्टर स्टेट’ म्हणून अनेक वर्षांपासून परस्पर सहकार्य करत आहेत. दोन्ही राज्यांदरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला होता, तर 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या कालावधीत सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण देवाणघेवाण झाली आहे.

जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाकायामा प्रांताच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले असून अजिंठा परिसरात जपानी पर्यटकांसाठी सुविधा विकसित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

नागपूरमध्ये बामियान बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव

अफगाणिस्तानातील बामियान येथील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुनरुज्जीवन घडवून आणलेल्या नागपूर शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम जगाला शांततेचा संदेश देणारा ठरेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच भारत-जपान मैत्रीचे प्रतीक म्हणूनही या प्रकल्पाकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-वाकायामा संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प

वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी महाराष्ट्रासोबतचा सहकार्य करार 2028 मध्ये पुन्हा नूतनीकरण करून नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याची इच्छा व्यक्त केली. “वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे,” असे सांगत त्यांनी दोन्ही प्रदेशांमधील संबंध आगामी काळात अधिक मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त केला.

— प्रतिनिधी | महालोकवार्ता

🔗 महाराष्ट्रासह देशातील ताज्या राजकीय आणि विकासाशी संबंधित घडामोडींसाठी 👉 महाराष्ट्र आणि भारत विभाग या कॅटेगरीला अवश्य भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको