Nagpur HSC Paper Leak Case: नागपूरमध्ये बारावी HSC परीक्षेतील फिजिक्स व केमिस्ट्री पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई. कोचिंग क्लास चालक आणि विद्यार्थ्याला अटक; व्हॉट्सअॅप ग्रुपमधून पेपर लीक झाल्याचा धक्कादायक खुलासा. पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा तपास सुरू.


नागपूर :नागपूर शहरात बारावी (HSC) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाची कारवाई केली आहे. बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. राज्यभरात चर्चेत आलेल्या या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निशिकांत मूल (वय ४५, रा. मानकापूर) हे ट्युशन क्लासेस चालवणारे संचालक असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच फरहान अख्तर या विद्यार्थ्यालाही या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नागपूरमधील सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
संशयित विद्यार्थिनीमुळे उघडकीस आला प्रकार
परीक्षेदरम्यान वारंवार प्रसाधनगृहात जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पर्यवेक्षकाला संशय आला. तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळून आला. मोबाईल जप्त करून तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
तपासात परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सकाळी 10.37 वाजता प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आल्याचे आढळले. ‘XII’ नावाच्या 21 सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर निशिकांत मूल यांच्या क्रमांकावरून पेपर पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही पेपर फुटल्याची पुष्टी
या प्रकरणात बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स (16 फेब्रुवारी) आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रसारित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी झालेल्या केमिस्ट्री परीक्षेपूर्वीच पेपर विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये आल्याने मोठा गैरप्रकार उघड झाला.
प्रकरण उघड होताच संबंधित मोबाईल क्रमांक बंद करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. फरहान अख्तर याने ग्रुपवर उत्तरं पोस्ट केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
नागपुरात बारावी परीक्षेतील पेपरफुटीचा नेमका काय प्रकार आहे. यासंदर्भातील सविस्तर बातमी वाचण्यासाठी 👉 नागपुरात बारावीचा केमिस्ट्री पेपर लीक? परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल ही बातमी वाचा.
न्यायालयाकडून पोलिस कोठडी
या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून लीक झाली, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 नागपूरसह परिसरातील बातम्या वाचा – विदर्भ


