Nandura Bus Fire : इंदूर–अकोला राष्ट्रीय मार्गावर नांदुरा येथे धावत्या खासगी बसला आग लागली. बसमधील सुमारे 30 प्रवासी चालकाच्या सतर्कतेमुळे सुरक्षित बाहेर पडले.


नांदुरा : इंदूर–अकोला राष्ट्रीय मार्गावर नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी (दि. ७ मार्च) पहाटे घडली. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
👉 बुलढाणा जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा : बुलढाणा
मिळालेल्या माहितीनुसार, एनएल ०७ बी ०६९४ क्रमांकाची खासगी बस इंदूरहून अकोल्याकडे येत होती. पहाटे सुमारे ६ वाजताच्या सुमारास बस नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर पोहोचली असता बसच्या इंजिनच्या भागातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धूर वाढत जाऊन बसला आग लागली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दलाचे जवान, नांदुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी, ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाने तत्काळ प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.
👉 जिल्ह्यासह परिसरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा : विदर्भ
या आगीत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बसला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी नांदुरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा : महाराष्ट्र


