Narnala Festival Akola Kailash Kher Live Concert : अकोल्यातील नरनाळा महोत्सवाचा पद्मश्री कैलास खेर यांच्या दमदार सुफी गायनाने भव्य समारोप झाला. ‘तेरी दिवानी’सह लोकप्रिय गाण्यांवर रसिक मंत्रमुग्ध; सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.


अकोला : गेल्या तीन दिवसांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी ठरलेल्या नरनाळा महोत्सवाचा आज सुरेल वातावरणात समारोप झाला. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांच्या दमदार आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली आणि संपूर्ण परिसर संगीताच्या सुरांनी भारावून गेला.
सुफी व लोकसंगीताचा संगम असलेल्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कैलास खेर यांनी ‘तेरी दिवानी’, ‘तेरे बिन नहीं लगता दिल मेरा’, ‘जयजयकारा’, ‘हे री सखी’ आणि ‘अल्लाह के बंदे’ यांसारखी लोकप्रिय गीते सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अस्सल भारतीय परंपरेची लय, भावपूर्ण शब्दरचना आणि आवाजातील आर्ततेमुळे प्रत्येक सादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.


‘जोबन छलके’ या गाण्यावर महिलांनी व्यासपीठावर येत खेर यांच्यासोबत ताल धरत नृत्य केले, त्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या सादरीकरणादरम्यान खेर यांनी प्रेक्षकांना थेट सहभागासाठी प्रोत्साहित करत संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार केले.
👉 नरनाळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम वाचा
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक कलावंत श्रीमयी धर्मपाल चिंचोलकर हिने ‘लूट गये’ हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच अकोट येथील स्थानिक कलाकारांनी देवीचा गोंधळ सादर करत पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले.


महोत्सवाच्या सकाळच्या सत्रात कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
👉 अकोला जिल्ह्यासह परिसरातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा
या समारोप सोहळ्यास आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार संजय गावंडे, अकोटच्या नगराध्यक्ष माया धुळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, वन क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी, राहुलसिंह टोलिया आदी मान्यवर उपस्थित होते.
नरनाळा महोत्सवाने तीन दिवसांमध्ये सांस्कृतिक, संगीत आणि पारंपरिक कलांचा संगम घडवत रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


