Palliative Care Program Maharashtra : राज्यात ‘पॅलिएटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय. रुग्णांना वेदनानिवारण, मानसिक आधार, घरपोच सेवा आणि सन्मानपूर्वक काळजी देण्यासाठी शासनाचा पुढाकार.


मुंबई : राज्यात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थेचे आजार, श्वसन विकार तसेच वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यापैकी अनेक आजार पूर्णपणे बरे होणारे नसून, अशा रुग्णांना दीर्घकाळ उपचार व सतत काळजीची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर शारीरिक वेदनानिवारण, मानसिक व सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन, घरपोच सेवा आणि जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मानपूर्वक जगण्याची सुविधा देणे आवश्यक ठरते.
ही गरज लक्षात घेता राज्य शासनाने ‘पॅलिएटिव्ह केअर’ (उपशामक काळजी सेवा) कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राज्यात ‘सार्वत्रिक राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम’ सुरू करण्यात येणार आहे.
‘पॅलिएटिव्ह केअर’ ही वैद्यकीय शाखा आजार बरा करण्यासाठी नसून, आयुष्यावर मर्यादा आणणारे आजार असलेल्या रुग्णांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी आहे. मर्यादित खर्चात ही सेवा रुग्णालयात तसेच समुदाय स्तरावर, घरगुती काळजी व आरोग्य केंद्रांमार्फत पुरविली जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांना सुलभ व दर्जेदार पॅलिएटिव्ह केअर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये हा कार्यक्रम सुरू करणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
‘सार्वत्रिक राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम’
कार्यक्रमाचे नाव :
सार्वत्रिक राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम
उद्देश :
दीर्घकालीन व आयुष्यावर मर्यादा आणणाऱ्या आजारांतील रुग्णांना वेदनामुक्त, सन्मानपूर्वक आणि सर्वांगीण काळजी देणे
सेवा उपलब्ध असलेली ठिकाणे :
जिल्हा रुग्णालये
उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये
प्राथमिक आरोग्य केंद्रे
नागरी आरोग्य केंद्रे
आरोग्यवर्धिनी केंद्रे
महत्त्वाच्या सुविधा :
शारीरिक वेदनानिवारण
मानसिक व सामाजिक आधार
कुटुंबीय समुपदेशन
२४ तास नर्सिंग केअर
फिजिओथेरपी
घरपोच (Home Care) सेवा
विशेष निर्णय :
मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधे थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध
बेड व्यवस्था :
प्रत्येक जिल्हा रुग्णालयात किमान ४ ते ६ बेड राखीव
🔗 👉 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णयानुसार, पॅलिएटिव्ह केअर सेवा केवळ अंतिम अवस्थेपुरती मर्यादित न ठेवता, आजाराचे निदान झाल्यापासून उपचारांच्या संपूर्ण कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य, जिल्हा, तालुका, प्राथमिक व समुदाय स्तरावर सेवा उभारणे, प्रशिक्षित बहुविषयक मनुष्यबळ तयार करणे, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा, जनजागृती, केअरगिव्हर प्रशिक्षण तसेच घरगुती सेवांना बळ देण्यावर भर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय म्हणजे मॉर्फिनसारखी वेदनाशामक औषधे थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देणे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ही औषधे लिहून देऊ शकणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेदना नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही. आरोग्य यंत्रणेसाठी हा एक मोठा मानसिक व प्रशासकीय बदल मानला जात आहे.
या योजनेत केवळ कर्करोगच नव्हे, तर हृदय, यकृत, मूत्रपिंड व फुफ्फुस निकामी होणे, स्ट्रोक, पार्किन्सन, डिमेन्शिया, वृद्धांमधील दीर्घकालीन वेदना, बाल पॅलिएटिव्ह केअर, अपंगत्व तसेच दीर्घकालीन मानसिक आजार यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना काही मोजक्या रुग्णांसाठी मर्यादित न राहता, सर्वसामान्य आणि दुर्लक्षित रुग्णांना वेदनामुक्त आधार देणारी ठरणार आहे.


