mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

पोहरादेवी विकास श्रद्धा जपतच होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव | Poharadevi tourism festival Washim

शेअर करा :

Poharadevi tourism festival Washim : वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा.

Poharadevi tourism festival Washim

 

वाशिम : संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला असून त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोहरादेवी हे केवळ श्रद्धास्थान नसून सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. दृकश्राव्य प्रणालीद्वारे संदेश देताना ते बोलत होते.

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

पर्यटन विकासातून संस्कृतीचे संवर्धन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसून स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखत सुविधा अधिक सक्षम करण्यात येतील. बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन कायम पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोहरादेवी पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार – उपमुख्यमंत्री शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत सेवालाल महाराजांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजवणारे असल्याचे सांगितले. पोहरादेवी हे धार्मिक स्थळ असण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता असलेले केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.

परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व्यवस्था आणि पर्यटक सुविधा उभारण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोहरादेवी विकासामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच उद्योगनिर्मितीलाही चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासकामांना शासनाचे भक्कम पाठबळ

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक करत पर्यटन महोत्सवाची रूपरेषा मांडली. संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर समाज मार्गक्रमण करत असल्याचे सांगत पोहरादेवी विकासासाठी शासनाचे भक्कम पाठबळ मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज यांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पर्यटन महोत्सवामुळे पोहरादेवीचा नावलौकिक वाढत असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे युवा पिढीला संस्कृतीची ओळख होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सेवारत्न पुरस्कारांचे वितरण

महोत्सवानिमित्त समाजसेवा, सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना ‘सेवारत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्तांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

राज्यस्तरावर लक्षवेधी ठरले आयोजन

या भव्य महोत्सवामुळे पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव राज्यपातळीवर विशेष लक्षवेधी ठरला. श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटन विकास यांचा प्रभावी संगम या कार्यक्रमातून दिसून आल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आमदार सई डाहाके, आमदार राजेश राठोड, आमदार किसन वानखडे, नगराध्यक्षा मोहिनी नाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

— प्रतिनिधी | महालोकवार्ता

🔗 वाशिमसह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी 👉 विदर्भ या कॅटेगरीला अवश्य भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको