mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Pune Grand Tour: सासवडमध्ये तिसऱ्या टप्प्याची सुरुवात; अजित पवारांनी दाखवली हिरवी झेंडी

शेअर करा :

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला सासवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुरुवात झाली. नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Pune Grand Tour

 

पुणे : “भारत माता की जय”, “जय भवानी जय शिवाजी” आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी सासवड परिसर दुमदुमून गेला. शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारलेले शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्सवाचे वातावरण यामध्येच ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.

सासवड नगर परिषद परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायकलपटूंशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Pune Grand Tour

 

कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अजित पवार म्हणाले, “पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्याने नेहमीच खेळांना प्राधान्य दिले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळाडूंना अधिक प्रेरणा मिळते. स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून मार्ग अत्यंत दर्जेदार आहेत. नागरिकांनी दिलेले प्रोत्साहन सायकलपटूंना नवी ऊर्जा देत आहे.”

या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून तसेच बजाज, सिरम इन्स्टिट्यूटसारख्या नामांकित कंपन्या आणि क्रीडा संघटनांच्या सहभागातून ही स्पर्धा यशस्वी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

137.7 किमीचा थरारक प्रवास

‘ पुणे ग्रँड टूर’च्या तिसऱ्या टप्प्याची एकूण लांबी 137.7 किलोमीटर होती. हा टप्पा सासवड येथून सुरू होऊन सुपे, पानवडी घाट, काळदरी, मांढर, माहूर, परींचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मोरगाव, तरडोली, जळगाव क. प., कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, वंजारवाडी मार्गे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय येथे संपन्न झाला.

मार्गावरील प्रत्येक गावात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्या, शिट्ट्या, घोषणाबाजी आणि वाद्यांच्या गजरात सायकलपटूंना प्रोत्साहन दिले. चौकाचौकात ‘पुणे ग्रँड टूर’चे कटआऊट्स, रस्त्यांची सजावट आणि शिस्तबद्ध बंदोबस्तामुळे संपूर्ण मार्गावर उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

आजच्या टप्प्यातील ठळक क्षण

▪️ अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी सायकलपटूंशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला.
▪️ सासवडकर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे होते, अनेकांच्या हातात तिरंगा होता.
▪️ सायकलपटूंनी प्रेक्षकांना ‘हाय-फाईव्ह’ देत प्रतिसाद दिला.
▪️ स्पर्धेचा शुभंकर सर्व वयोगटात आकर्षण ठरला.
▪️ पोलिसांच्या चोख बंदोबस्तात तिसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको