Risod Mehkar Road Accident : रिसोड–मेहकर मार्गावरील सरपखेडा फाट्याजवळ टँकर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात कृषी मंडळाधिकारी विलास बारबले यांचा मृत्यू, तर कृषी सहायक प्रवीण पुन्नमवार गंभीर जखमी. पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहतूक सुरळीत केली.


रिसोड : रिसोड–मेहकर मार्गावरील सरपखेडा फाट्याजवळ टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कृषी विभागातील मंडळ अधिकारी विलास बारबले (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृषी सहायक प्रवीण पुन्नमवार (वय ३६) हे गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, विलास बारबले आणि प्रवीण पुन्नमवार हे दोघे दुचाकीने एकलासपूर येथून रिसोडकडे येत होते. दरम्यान, सरपखेडा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टँकरची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज आणि तीव्रता इतकी भीषण होती की विलास बारबले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रवीण पुन्नमवार हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवीण पुन्नमवार यांना त्वरित उपचारासाठी रिसोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विलास बारबले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. कृषी विभागातील जबाबदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या विलास बारबले यांच्या अकाली निधनामुळे विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
🔗 वाशिम जिल्ह्यातील इतर महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे “वऱ्हाड” विभागाला भेट द्या.


