mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

सांगलीत शिवजयंतीनिमित्त मेगा पदयात्रा; ‘जय शिवाजी’ घोषणांनी शहर शिवमय | Shivaji Maharaj Jayanti Sangli Mega Padyatra

शेअर करा :

Shivaji Maharaj Jayanti Sangli Mega Padyatra : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहर शिवमय झाले. मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले.

Shivaji Maharaj Jayanti Sangli Mega Padyatra
सांगली : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘रयतेच्या राजाला’ आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद ते मारुती चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य मेगा पदयात्रेमुळे संपूर्ण सांगली नगरी शिवमय झाली. “जय शिवाजी, जय भवानी”च्या घोषणांनी आणि लेझीमच्या तालाने वातावरण दणाणून गेले होते. या पदयात्रेत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

🔗 राज्यातील शिवजयंती उत्सवांच्या बातम्या वाचा 👉 महाराष्ट्र बातम्या

शिवकालीन युद्धकलेची प्रभावी सादरीकरणे

पदयात्रा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तलवारबाजी आणि लाठी-काठीच्या चपळ सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सादर झालेली लेझीम आणि मल्लखांबावरील कसरतींनी कार्यक्रमात रंगत आणली. शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांनी वातावरणात वीररस निर्माण केला.

Shivaji Maharaj Jayanti Sangli Mega Padyatra

पारंपरिक वेशभूषा ठरली आकर्षण

पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक आणि विद्यार्थी हे पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. अनेक बालकांनी ‘प्रतिकात्मक बाल शिवबा’ आणि ‘बाल जिजाऊ’ यांची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

असा होता पदयात्रेचा मार्ग

जिल्हा परिषद येथून सुरू झालेली पदयात्रा राम मंदिर चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक मार्गे पुढे जात मारुती चौक, सांगली येथे पोहोचली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकारी व इतर विभागप्रमुखांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि पदयात्रेची सांगता करण्यात आली.

या पदयात्रेत विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

🔗 अशाच ताज्या घडामोडींसाठी वाचा 👉 लेटेस्ट न्यूज

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पदयात्रेची सुरुवात जिल्हा परिषद येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, तहसिलदार लीना खरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, सर्व अधिकाऱ्यांनी पदयात्रेत प्रत्यक्ष चालत सहभाग नोंदवून शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको