Shivaji Maharaj Statue Dispute Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे शिवरायांच्या पुतळा वादातून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना. निषेध आंदोलन सुरू असून गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


लोणार (बुलढाणा) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात शिवजयंतीनंतर दुसऱ्याच दिवशी (२० फेब्रुवारी) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
.
👉 “राज्यातील इतर कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित बातम्या येथे वाचा” – गुन्हे वार्ता
घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर “सगळं संपलं, उद्या सकाळी आत्महत्या करते,” असा मजकूर टाकल्याची माहिती समोर आली. हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावातील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. दरम्यान, जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी गावाला भेट देत शांतता राखण्याचे आवाहन केले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


निषेध आंदोलन; राजकीय नेत्यांची गावाकडे धाव
घटनेची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी चिखला काकड येथे दाखल झाले. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. गावात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
👉 “बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी” साठी वाचा – विदर्भ
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही प्रकरणाची दखल घेतल्याची माहिती असून ते पीडित महिलेची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पुतळा हटविण्याच्या हालचालींमुळे वाद
काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र गावचे सरपंच व त्यांच्या समर्थकांकडून पुतळा हटविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संजीवनी वाघ घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर वाद वाढून झटापट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
👉 “राजकीय घडामोडींच्या इतर बातम्यां”साठी वाचा – राजकारण
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याची माहिती असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आंदोलनाची चेतावणी
घटनेनंतर चिखला काकड गावात तसेच पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अॅड. निशिकांत राजे जाधव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरू
घटनेनंतर गावाला छावणीचे स्वरूप आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता
बातमी अपडेट होत आहे….


