SSC HSC teacher transfer decision : दहावी व बारावी परीक्षांसाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांची सरसकट अदलाबदल स्थगित. सीसीटीव्ही नसलेल्या मोजक्या केंद्रांवरच अदलाबदल; शिक्षकांना मोठा दिलासा.


पुणे : कॉपीमुक्त अभियानांतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी परीक्षा केंद्रावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांची सरसकट अदलाबदली करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला होता. मात्र या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर आता या निर्णयाला स्थगिती देत सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या परीक्षा केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची व्यवस्था नाही, केवळ अशाच मोजक्या केंद्रांवर शिक्षक व कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात येणार आहे.
राज्यभर १० फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत असून ३३७३ केंद्रांवर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ५१३० केंद्रांवर त्या घेण्यात येणार आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर अशा सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.
यापूर्वी केंद्र संचालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची सरसकट एका शाळेतून दुसऱ्या शाळेत अदलाबदल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हा निर्णय ३ डिसेंबर २०२५ च्या पत्रानुसार घेण्यात आला होता. मात्र या सरसकट अदलाबदलीला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. यासंदर्भात राज्य मंडळाकडे शिक्षक संघटनांच्या बैठका घेण्यात आल्या.


यानंतर शिक्षण मंडळाने सुधारित निर्णय घेत सरसकट शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. विभागीय मंडळांना ३० जानेवारी रोजी दिलेल्या निर्देशानुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा असलेल्या परीक्षा केंद्रांवर स्थानिक शिक्षकच पर्यवेक्षणाचे काम करतील, तर ज्या केंद्रांवर सीसीटीव्हीची व्यवस्था नाही, केवळ अशाच केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येईल.
या निर्णयामुळे इतर वर्गांचे अध्यापन कार्य प्रभावित होणार नाही, तसेच महिला शिक्षिकांना अदलाबदलीमुळे होणारा प्रवासाचा व नियोजनाचा त्रास टळणार असल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सुधारित निर्णयाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.
🔗 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घडामोडी व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान, परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात याबाबत कोणतेही दुमत नसल्याचे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे. सर्व शिक्षकांवर अविश्वास दाखवून सरसकट अदलाबदलीचा निर्णय घेण्यात आला होता, याला विरोध होता. मंडळाच्या या सुधारित निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिक्षण समन्वय समितीचे सचिव तथा विज्युक्टा अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी व्यक्त केली.


