

तीन भिंतींच्या घराची गोष्ट..


शांतीनगर, अकोला
‘तिघी’ हा मराठी चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. सिनेमा ची कथा अत्यंत वास्तव असून डोकं सुन्न करणारी आहे.


समाजातील न बोललेले विषय
आपल्या संपूर्ण भारतीय समाजात अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य करण्याचे आपण टाळतो कारण समाजाचे परिवाराचे काही अलिखित नियम असतात ते आपण पाळतो. किंबहुना आपल्याला ते कुटुंबासाठी का होईना पाळावे लागतात. परंतु जे या पलिकडे जावुन विचार करतात तिथे क्रांती ची बीजे रुजली जातात आणि इतिहास त्यांना आठवन ठेवतो.
आपल्या समाजाला एक रोग फार पूर्वीपासून जडला आहे.
‘सबसे बडा रोग
क्या कहेंगे लोग’
यामुळे सहसा समाजामाध्यमांवर चित्रपटात जे विषय हाताळला तो चर्चीला जात नाही. कारण कुटुंब व कुटुंबाची सो कॅाल्ड इभ्रत धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते.
चित्रपटाची कथा
जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा चित्रपट आई आणि तिच्या दोन मुलींच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत, त्याग, अपराधीपणा आणि शेवटी मिळणारी समजूतदारी यावर आधारित आहे.
मुंबईत काम करणारी स्वाती आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेली आहे. ज्या कंपनीत काम करते तेथील बॅास ने आर्थिक मदत केल्यामुळे स्वाती वर आता त्याचा चं अधिकार आहे अशाप्रकारचे वातावरण, त्याचवेळी स्वाती ला आई आजारी असल्याची बातमी कळते आणि ती पुण्याला घरी येते.
या एका क्षणी स्वाती, सारिका आणि त्यांची आई हेमा या तिघी पुन्हा एकत्र येतात. आणि मधल्या काही वर्षांतला नात्यामधील दुरावा, अबोला, राग, माया सगळंच एकत्र येतं.
आईच्या त्यागाची कथा
‘आई’ ची महती काय ? हे मी वेगळं सांगायला नको. अनादीकाळापासुन आई चे महात्म्य आपल्या सर्वांसमक्ष आहे. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी ती काय करु शकते हे सर्वश्रुत आहे.
या सिनेमात देखील आपल्या मुलींच्या भविष्यासाठी संपूर्ण जीवन आई समर्पित करते. वडील जीवंत असतांना ही तुमचे वडील लहाणपणी गेले असे सांगते आणी आपल्या दोन्ही मुलींचे उत्तम पालनपोषण करते.
चित्रपटाची तांत्रिक बाजू
दिग्दर्शक : जीजिविषा काळे
कलाकार : भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे
संगीत : निलेश मोहरीर, अव्दैत नेमळेकर
सिनेमॅटोग्राफी : मिलिंद जोग
प्रदर्शन : ६ मार्च २०२६
संगीतकार निलेश मोहरीर आणि अव्दैत नेमळेकर यांनी कथेला साजेशे संगीत दिले आहे. मिलिंद जोग यांनी उत्तम सिनेमॅटोग्राफी केली आहे.
चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे. मात्र उत्तरार्धात वेग आल्याने चित्रपट भावनिकदृष्ट्या आपल्याला खिळवून ठेवतो.
मराठी भाषा मराठी अस्मीतेच्या फक्त गप्पा मारुन चालणार नाही तर थिएटर मध्ये जावुन मराठी चित्रपट बघायला पाहीजे. प्रत्येकांनी एकदा नक्की बघावा….
टीप : वरील लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.


