mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

वाशिममध्ये गॅस बुकिंग ठप्प; तांत्रिक अडचणींमुळे एजन्सीसमोर रांगा, 2-3 दिवसांनी सिलेंडर डिलिव्हरी | Washim Gas Booking Problem

शेअर करा :

Washim Gas Booking Problem : वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांना एजन्सीवर जाऊन बुकिंग करावे लागत आहे. बुकिंगनंतरही सिलेंडरची डिलिव्हरी 2-3 दिवसांनी मिळत असल्याने गैरसोय होत आहे.

Washim Gas Booking Problem
वाशिम : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बुकिंगसाठी दिलेल्या क्रमांकावर प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच ऑनलाइन प्रणाली आणि सर्व्हर व्यवस्थित कार्यरत नसल्याने ग्राहकांना थेट गॅस एजन्सीवर जाऊन बुकिंग करण्याची वेळ येत आहे. परिणामी अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन प्रमुख कंपन्यांच्या एकूण १८ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. या एजन्सींमार्फत दररोज सरासरी ४ हजार २०३ घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र सध्या तांत्रिक कारणांमुळे गॅस बुकिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.

Washim Gas Booking Problem

बुकिंग नंबरवर प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग प्रक्रियेलाही विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अनेक ग्राहक गॅस सिलेंडर आधीच भरून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तात्पुरते थांबवून केवळ घरगुती सिलेंडरचे वाटप सुरू ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

👉 वाशिमसह परिसरातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा : विदर्भ

अनेक प्रयत्नांनंतर बुकिंग यशस्वी झाल्यानंतरही ग्राहकांना तात्काळ सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना दोन ते तीन दिवसांनी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा : ब्रिजेश पाटील

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा Washim Newsभासणार नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या समन्वयाने काम करत असून जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे इंधन तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला असून सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको