Washim Fire News : वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे येथे वीजतारांच्या ठिणगीने गव्हाच्या पिकाला आग लागून सुमारे 3 ते 4 एकर पीक जळून खाक. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.


वाशिम : तालुक्यातील सावरगाव जिरे येथील शेतशिवारात वीजवाहिनीच्या तारांमधील घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीने गव्हाच्या पिकाला आग लागून सुमारे तीन ते चार एकरांतील उभे पीक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. ७) दुपारी घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
🔗 वाशिम व परिसरातील बातम्या वाचण्यासाठी वाचा : विदर्भ
माहितीनुसार, रिठद रस्त्यालगतच्या शेतशिवारातून जाणाऱ्या वीजवाहिनीवरील लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण झाल्याने ठिणगी पडली. ही ठिणगी काढणीस तयार असलेल्या गव्हाच्या पिकावर पडताच काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले. त्यांनी पाणी व उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक जळून गेले होते.
या आगीत ओंकार वानखेडे यांचा सुमारे दीड एकर गहू, दत्ता सोपान वानखेडे व सिताराम सोपान वानखेडे यांचा प्रत्येकी एक एकर गहू जळून खाक झाला. तसेच दामोदर काळे यांच्या अर्ध्या एकरातील गव्हाचेही नुकसान झाले. याशिवाय श्रीराम सोपान वानखेडे यांच्या शेतातील हळदीसाठी बसविण्यात आलेली ड्रीप सिंचनाची पाईपलाईनही आगीत जळून नुकसान झाले.
घटनेची दखल घेऊन महसूल प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


