Akola GMC doctor attack : अकोला जीएमसी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड झाला. डिस्चार्जनंतर कागदपत्रांवरून वाद झाल्यानंतर रुग्णाने डॉक्टरवर सलाईन स्टॅन्डने हल्ल्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.


अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) व सर्वोपचार रुग्णालयात एका रुग्णाने डॉक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डिस्चार्जनंतर उपचाराशी संबंधित कागदपत्रांची मागणी करताना वाद निर्माण झाल्याने संतप्त रुग्णाने डॉक्टरला शिवीगाळ केली आणि हातातील सलाईन स्टॅण्ड घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवार, १२ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
👉 अकोला शहरातील ताज्या बातम्या वाचा : विदर्भ
प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे वैद्यकीय डिस्चार्जशी संबंधित कागदपत्रे देण्याची मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या नियमांनुसार काही वैद्यकीय कागदपत्रे थेट देणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या कारणावरून रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाने संताप व्यक्त करत डॉक्टरांवर धावून जात सलाईन स्टॅण्डने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


या घटनेनंतर डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र राज्य इंटर असोसिएशन या संघटनेच्या वतीने जीएमसीचे अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात हल्ला करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न
डॉक्टरांच्या संघटनेने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी तसेच रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर शुक्रवारी तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.
सुरक्षा रक्षक असतानाही हल्ला कसा?
जीएमसी रुग्णालयात डॉक्टरांच्या राऊंडच्या वेळी सुरक्षारक्षकांनी त्यांच्यासोबत राहण्याचा नियम आहे. मात्र प्रत्यक्षात राऊंडच्या वेळी सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
👉 वाशिममध्ये गॅस बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणी
यापूर्वीही जीएमसी रुग्णालयात चोरी, हाणामारी, खून आणि इतर गैरप्रकारांच्या घटना घडल्याची नोंद आहे. गतवर्षी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी १५९ सुरक्षा रक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरीही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी खरोखर सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


