mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Akola Channi Minor Girl Assault Case | १० वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी जगराम आडे अटकेत; १०५ पोलिसांची जंगलात शोधमोहीम

शेअर करा :

Akola Channi Minor Girl Assault Case : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी जगराम गोविंदा आडे (वय ६०, रा. सावरगाव ता. पातूर जि. अकोला) याला अखेर पोलिसांनी दोन दिवसांच्या थरारक शोधमोहीमेनंतर सावरगावच्या जंगल परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईसाठी अकोला पोलिस दलातील तब्बल १०५ पोलिसांची वेगवेगळी पाच पथके, दोन श्वान पथके, चार ड्रोन कॅमेरे तसेच वन विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते.

Akola Channi Minor Girl Assault Case

अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी जगराम गोविंदा आडे (वय ६०, रा. सावरगाव ता. पातूर जि. अकोला) याला अखेर पोलिसांनी दोन दिवसांच्या थरारक शोधमोहीमेनंतर सावरगावच्या जंगल परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईसाठी अकोला पोलिस दलातील तब्बल १०५ पोलिसांची वेगवेगळी पाच पथके, दोन श्वान पथके, चार ड्रोन कॅमेरे तसेच वन विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ०५ मे २०२६ रोजी पीडित मुलीच्या आईने चान्नी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. फिर्यादी व तिचे पती मजुरीसाठी बाहेर गेले असताना पीडिता घरी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी जगराम आडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले.

👉 हे देखील वाचा : अकोला जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; रोहित पवारांची पीडित कुटुंबीयांना भेट

पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर फिर्यादीने मुलीसह पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक २०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ६५ (२), ३५१ (२) (३) तसेच पोक्सो कायद्यान्वये कलम ३, ४, ४ (२), ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि रविंद्र लांडे, पो.उप.नि. विष्णु बोडखे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, चान्नी पोलीस स्टेशन आणि विविध पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Akola Channi Minor Girl Assault Case

दुर्गम जंगलातील शोध मोहीम मोठे आव्हान

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहा. पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके, चान्नी पोलीस स्टेशनचे पथक, उपविभाग बाळापूर अंतर्गत येणारी पथके, आर.सी.पी.ची दोन पथके, दोन श्वान पथके आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

आरोपीकडे मोबाईल किंवा वाहन नव्हते. त्याचा कोणताही पोलीस रेकॉर्डवरील फोटो उपलब्ध नव्हता. शिवाय जंगल परिसराची त्याला पूर्ण माहिती असल्याने पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेणे मोठे आव्हान बनले होते. सावरगाव, चोंडी, वनदेव, वसाली, नवेगाव, पांगरताटी, झरंडी, शेकापूर परिसरातील २० ते २५ किलोमीटरच्या घनदाट जंगलात वाहन जाऊ शकत नसल्याने पोलिसांना रखरखत्या उन्हात पायी शोधमोहीम राबवावी लागली.

वन विभाग, ड्रोन आणि ग्रामस्थांची विशेष मदत

पोलिसांनी ०६ मे ते ०७ मे दरम्यान अहोरात्र जंगल परिसरात शोध घेतला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी वन विभागाच्या डी.एफ.ओ. सुमन सोळंके यांच्याकडे मदत मागितल्यानंतर वन विभागाचे पथकही या मोहिमेत सहभागी झाले. गुरुवार ०७ मे रोजी वन विभागाचे आर.एफ.ओ. जाधव, आलेगाव यांचे पथक तसेच सावरगाव येथील नागरिकांच्या मदतीने आरोपी जगराम गोविंदा आडे हा सावरगाव जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसताना आणि कोणतीही ठोस तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना पोलिसांनी केलेल्या मेहनतीला अखेर यश मिळाले.

पीडित कुटुंबाची रोहित पवार, नितीन देशमुख यांनी घेतली भेट

दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी ७ मे रोजी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. रोहित पवार यांनी पीडित मुलीच्या धैर्याचे कौतुक करत तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली. “मुलगी शिक्षणात हुशार आहे. तिचे शिक्षण थांबू देणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
पीडित कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करणारे असल्याने शासनाने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महिलांमध्ये संताप; कठोर शिक्षेची मागणी

या घटनेमुळे परिसरातील अल्पवयीन मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “राज्यात अशा घटना घडत असतील तर मुलींना जन्माला आणणे बंद करावे लागेल,” असा संतप्त सवाल पीडितेच्या आईसह महिलांनी उपस्थित केला. आमदार नितीन देशमुख यांनीही पीडित कुटुंबीयांची व्यथा जाणून घेत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

 

— प्रतिनिधी महालोकवार्ता 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको