Samruddhi Expressway robbery case Buldhana : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील १२ लाखांच्या दरोड्याचा पोलिसांनी उलगडा केला. बीडमधून ८ आरोपी अटकेत, पिस्टल, रोख रक्कम व वाहने जप्त.


बुलढाणा : समृद्धी महामार्गावर रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या गुजरातमधील व्यावसायिक प्रतिनिधीला लुटल्याच्या थरारक घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी कारवाईत बीड जिल्ह्यातून ८ आरोपींना अटक करण्यात आली असून पिस्टल, काडतुसे, रोख रक्कम, वाहने व मोबाईल असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी अभयसिंह आनंदसिंह वाघेला (वय ३२, रा. लवाना, ता. लाखणी, जि. बनासकाठा, गुजरात) यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दि. २ मे रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता ते त्यांच्या मालकाच्या धान्य व्यापारातील १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ वाहनाने नागपूरहून गुजरातकडे समृद्धी महामार्गाने जात होते.
👉 हे देखील वाचा : बाभुळगावजवळ भीषण अपघात : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुलगा गंभीर
दरम्यान, दुसरबीड टोलनाक्याजवळील पुलावर वाहनाच्या टायरमधील हवा तपासत असताना, मागून आलेल्या बोलेरो व इनोव्हा या दोन वाहनांमधून उतरलेल्या १० ते १२ जणांनी त्यांना घेरले. आरोपींनी मारहाण करत पिस्तुलाचा धाक दाखवून स्कॉर्पिओ (अंदाजे किंमत ८ लाख) आणि १२ लाखांची रोकड लुटली. त्यानंतर फिर्यादीला जालन्याच्या जंगल परिसरात सोडून आरोपी फरार झाले होते.
घटनेनंतर किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली तपासाला वेग देण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून धाडसी कारवाई करत ८ आरोपींना अटक केली.
👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्गावर टायर फुटून स्कार्पिओ पलटी; कारंजा जवळ पाच जण जखमी
या टोळीतील आरोपी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू-काश्मीर या विविध राज्यांतील असल्याचे समोर आले असून, हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींकडून १ लाख ८० हजार रुपये रोख, एक देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, इनोव्हा व बोलेरो वाहने, मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, शरद गिरी, दिगंबर कपाटे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. अमोल अंभोरे, गजानन गोरले, मनोज खरडे, चापोहेकॉ. सुरेश भिसे, तसेच तांत्रिक विभागातील राजू आडवे व ऋषी खंडेराव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला असून महामार्गावरील सुरक्षेबाबत पोलिसांची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता


