IMD Weather Alert : राज्यात तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचत असतानाच हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.


मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून उष्णतेसोबतच अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता मार्च महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे कडाक्याचे ऊन तर दुसरीकडे पावसाची शक्यता अशा दुहेरी परिस्थितीचा सामना राज्याला करावा लागत आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचल्याने उकाडा आणि उष्णता प्रचंड वाढली आहे. थंड हवामानासाठी ओळख असलेल्या नाशिकमध्ये मार्च महिन्यातच तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शनिवार व रविवारी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर तापमानात चढउतार राहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामानातील या अचानक बदलाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. तापमानातील चढउतार आणि वातावरणातील बदलामुळे आंब्याला आलेला मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत असून हजारो आंबा उत्पादकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


