Akola municipal corporation clash Agrawal Bharuka : अकोला महापालिकेत 13 एप्रिलच्या वादानंतर 15 एप्रिलला पुन्हा अग्रवाल आणि भारुका आमनेसामने. निलंबनानंतरही तणाव वाढला; प्रकरण पोलिसांपर्यंत.


अकोला : अकोला महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीत १३ एप्रिल रोजी निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चिघळल्याचे बुधवारी (१५ एप्रिल) समोर आले. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक सागर भारुका यांच्यातील संघर्ष महापालिका प्रांगणात पुन्हा उफाळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
👉 हे देखील वाचा : करवंड महोत्सव 2026: शिवाजी महाराज-विवाहाच्या 370 वर्षांनिमित्त भव्य सोहळा
१३ एप्रिल रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान विकासकामांच्या दर्जाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला होता. शाब्दिक चकमकीतून वाद इतका वाढला की दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची घटना घडली. यावेळी उपस्थित सदस्य, पोलिस तसेच भाजपचे गटनेते पवन महले यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या घटनेनंतर सागर भारुका यांना १५ दिवसांसाठी निलंबित करून सभागृहाबाहेर काढण्यात आले होते.


निलंबनानंतर काही काळ वातावरण शांत असल्याचे दिसत असतानाच बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता महापालिका प्रांगणात पुन्हा दोन्ही नेते आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही क्षणांतच तो तीव्र बनला आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे सांगितले जाते. या वेळी उपस्थितांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सागर भारुका यांच्यासोबत असलेले मंगेश काळे यांनी त्यांना तेथून दूर नेले.


घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी आपल्या समर्थकांसह सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत सागर भारुका यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकारामुळे महापालिका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती लक्षात घेता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेदरम्यान शिवीगाळ झाल्याचा आरोप सागर भारुका यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणावर सत्ताधारी पक्ष किंवा विजय अग्रवाल यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या सलग घडामोडींमुळे महापालिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


