Balapur water tank dead monkey health risk village negligence | बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत माकड आढळल्याने खळबळ उडाली. ग्रामप्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह, नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त.


बाळापूर : तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत माकड आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीमार्फत नळयोजनेद्वारे गावात पाणीपुरवठा केला जातो. मात्र १७ एप्रिल रोजी या पाणीपुरवठा टाकीतच एक माकड मृत अवस्थेत आढळून आले. ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी टाकीजवळ मोठी गर्दी केली. माकडाचा मृत्यू नेमका कधी झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे वळत असल्याची शक्यता वर्तवली जात असून, संबंधित माकड पाणी पिण्यासाठी टाकीवर गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोंडे यांनी सांगितले की, पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून, संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
ते पाणी कसे प्यावे?
उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. अशातच पाण्याच्या टाकीत मृत माकड आढळल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्या टाकीतील पाणी कसे प्यावे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


