Washim News: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ जानेवारी रोजी रब्बी हंगामातील नवीन हरभरा खरेदीला अधिकृत प्रारंभ झाला. नव्या हरभऱ्याच्या पहिल्याच लिलावाला (हर्राशी) शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


वाशिम : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ जानेवारी रोजी रब्बी हंगामातील नवीन हरभरा खरेदीला अधिकृत प्रारंभ झाला. नव्या हरभऱ्याच्या पहिल्याच लिलावाला (हर्राशी) शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या हर्राशीच्या माध्यमातून नवीन हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार ५१ रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
यंदाच्या रब्बी हंगामात पहिल्यांदाच नवीन हरभरा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांसह अडते व व्यापाऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून, आगामी काळात हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे, उपसभापती गोवर्धन पाटील चव्हाण, संचालक राजू चौधरी, सुरेश भोयर, हिराबाई जानेवाले यांच्यासह बाजार समितीतील व्यापारी, अडते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी महादेवराव काकडे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समितीमार्फत पारदर्शक पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नवीन हरभऱ्याला मिळालेला समाधानकारक दर पाहता, शेतकऱ्यांनी बाजार समितीमार्फत विक्री करावी, असे आवाहनही करण्यात आले.


