Jalna Grant Scam: जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळ्याप्रकरणी 3 तलाठ्यांसह 5 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर या सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुनील रामकृष्ण सोरमारे (37, व्यवसाय मंडळ अधिकारी, बदनापूर), बप्पासाहेब रखमाजी भुसारे (53, तलाठी, अंबड), रामेश्वर नाना जाधव (48, तलाठी, अंबड), वैभव विश्वंभर आडगावकर (36, नेटवर्क इंजिनिअर, अंबड) आणि विजय निवृत्ती भांडवले (34, ऑपरेटर, गेवराई, जि. बीड). , अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
24 कोटी 90 लाख रुपयांचा अनुदान घोटाळा उघड
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. मात्र, बोगस लाभार्थी याद्या तयार करून या अनुदानाच्या वाटपात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे समोर आले.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार 240 गावांमध्ये अनुदान वाटपात तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या घोटाळ्याप्रकरणी मंडळ अधिकारी, 22 तलाठी व इतर कर्मचाऱ्यांसह एकूण 28 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अनेक आरोपी फरार झाले होते. यातील 15 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
दरम्यान, फरार आरोपींनी जामिनासाठी सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केले होते. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते.
पोलीस पथकाची संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, पाठक मेजर तसेच महिला अंमलदार जया निकम, निमा घनघाव आणि मंदा नाटकर यांच्या पथकाने केली.


