Ladki Bahin Yojana Payment Issue: लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने वाशिममध्ये महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; केवायसी दुरुस्ती व थकीत हप्त्यांची मागणी.


वाशिम : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र असतानाही मागील हप्ता न मिळाल्याने वाशिम जिल्ह्यातील शेकडो महिलांचा संताप सोमवारी उफाळून आला. संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली.
केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ मिळत नसल्याने अनेक महिला गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागात खेटे घालत आहेत. दरम्यान, महिला व बालविकास विभागाने चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती दिली आहे.
विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला, चारचाकी वाहनधारक कुटुंबातील महिला, अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या तसेच इतर निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
मात्र, सर्व निकष पूर्ण करूनही आपल्याला योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा अनेक महिलांनी केला आहे. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता मिळालेला नाही, अशी तक्रारही महिलांनी केली.
प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन केवायसी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, पात्र महिलांचा लाभ तातडीने सुरू करावा तसेच थकीत हप्ते त्वरित वर्ग करावेत, अशी जोरदार मागणी संतप्त महिलांनी केली आहे.


