mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Raigad-Pen Growth Center Announced : दावोस दौरा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा : देवेंद्र फडणवीस | रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा

शेअर करा :

Raigad-Pen Growth Center Announced : दावोस दौऱ्यातून महाराष्ट्राला ज्ञान, तंत्रज्ञान व विदेशी गुंतवणूक मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा व एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले.

Davos : Raigad-Pen Growth Center Announced

दावोस : स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेनिमित्त करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतासाठी आणि पर्यायाने महाराष्ट्रासाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची अधिकृत घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आज प्रामुख्याने धोरणात्मक स्वरूपाचे सामंजस्य करार करण्यात आले असून, यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह – लंडन, आयसीसीआय – इटली, अलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, सुबाना जुराँग – सिंगापूर यांच्यासोबत तांत्रिक सहकार्याचे करार करण्यात आले आहेत.

Davos : Raigad-Pen Growth Center Announced

या करारांमुळे केवळ गुंतवणूकच नव्हे, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानही राज्यात येणार असून, उद्योग, अर्बन प्लॅनिंग आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. अर्बन प्लॅनिंग आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील या करारांमुळे शहरांतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षमपणे विकसित करता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दावोस दौऱ्यातून नॉलेज, टेक्नॉलॉजी आणि एफडीआय मिळत असून, त्याचा देशाला आणि राज्याला मोठा फायदा होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

रायगड-पेण ग्रोथ सेंटर : नव्या बिझनेस डिस्ट्रिक्टची निर्मिती

नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर रायगड-पेण ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची आज अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या ठिकाणी ‘प्लग अँड प्ले’ पद्धतीने उद्योगांना तत्काळ काम सुरू करता येणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येणार असून शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक संयुक्तपणे काम करतील. येथे नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करण्यात येणार असून, उच्च पगाराच्या नोकऱ्या, ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स आणि फिनटेक इकोसिस्टिम उभारली जाणार आहे. बीकेसीच्या धर्तीवर या ठिकाणी बिझनेस डिस्ट्रिक्ट साकारले जाणार आहे.

या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून, रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडचा एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा मेपल ट्री, जीनव्ही, इंडोस्पेस पार्क समूह आणि अमेरिकेतील ट्रिबेका डेव्हलपर्स यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या गुंतवणुकीतून वॉक-टू-वर्क सुविधांसह एक आधुनिक शहर उभे राहणार असून, तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर प्रत्यक्षात साकार होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जागतिक नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्याबाबत चर्चा केली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येण्याची शक्यता असून, एमएसएमई क्षेत्राला चालना मिळणार आहे.  बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांच्याशी सर्वसमावेशक विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत चर्चा झाली.

ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी महाराष्ट्रातील ईव्ही धोरणाचे कौतुक करत पुढील काळात पाच नवीन ईव्ही मॉडेल्स आणण्याची घोषणा केली. पुणे येथील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रणही त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिले.

जेबीआयसीचे गव्हर्नर हयाशी नोबुमित्सू यांनी ईव्ही बसेस आणि अर्बन मोबिलिटी क्षेत्रातील हरित गुंतवणुकीच्या संधी अधोरेखित केल्या.

एपी मोलर मर्सेकचे सीईओ विन्सेंट क्लार्क यांनी महाराष्ट्रात 2.5 बिलियन डॉलर्सच्या टर्मिनल संधींबाबत सूतोवाच केला.

फिनलंडचे मंत्री विले त्याविओ, इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल, हॅवलेट पॅकर्डच्या पॅट्रिका रुसो आणि भावना अग्रवाल, अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनेक तसेच एमआयटी मीडिया लॅबच्या जेसिका रोसेनवर्सेल यांच्याशीही विविध क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको