bangladesh boycott t20 world cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. भारताविरुद्ध सामने श्रीलंकेत हलविण्याची मागणी आयसीसीने फेटाळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कप 2026 चे सामने 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. मात्र, या स्पर्धेपूर्वीच बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील तणाव अधिकच वाढला आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 22 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत बांग्लादेश क्रिकेट संघ आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
हा निर्णय आयसीसीने बांग्लादेशची मागणी फेटाळल्यानंतर घेण्यात आला. बांग्लादेशने त्यांच्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यांचे आयोजन श्रीलंकेत करण्यात यावे, अशी विनंती आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी नाकारली.


आयसीसीकडून दिलासा न मिळाल्यानंतर, बीसीबीने बांग्लादेश सरकारसोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. मात्र, तरीही बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम राहिला आहे.
आता बांग्लादेशने टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेतल्यास, त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हा संपूर्ण वाद तेव्हा वाढला, जेव्हा बांग्लादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल 2026 पूर्वी बीसीसीआयच्या आदेशानुसार कोलकाता नाइट रायडर्स संघाने रिलीज केले. हा निर्णय बांग्लादेशमध्ये हिंदूंच्या हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने घेतल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे संतप्त झालेल्या बांग्लादेश सरकारने त्यांच्या देशात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली. त्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे सामने अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली होती.


