Jalna Municipal Corporation: जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीनंतर महापौर पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. भाजपकडील चार महिला नगरसेविकांपैकी कोण महापौर होणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.


जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत पहिला महापौर होण्याचा मान महिलेला मिळाला आहे. गुरुवार, 22 जानेवारी रोजी झालेल्या सोडतीत जालना महापौर पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे जालना महापालिकेत आता महिला नेतृत्वाचे युग सुरू होणार असून पहिल्या महापौर कोण ठरणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
15 जानेवारी रोजी पार पडलेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीत एकूण 65 नगरसेवक निवडून आले आहेत. आता महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांची आरक्षण सोडत गुरुवारी मंत्रालय, मुंबई येथे पार पडली.
आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने जालन्यात भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडे चार अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला नगरसेविका असून त्यामध्ये रिमा खरात, वंदना मगरे, श्रद्धा साळवे आणि रुपा कुरील यांचा समावेश आहे. यापैकी रिमा खरात, वंदना मगरे आणि श्रद्धा साळवे या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या आहेत.
म्हणूनच या तिघींपैकी एखाद्याच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते की, दानवे गटाच्या रुपा कुरील बाजी मारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जालना महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपने पहिला महापौर आपलाच व्हावा, यासाठी सुरुवातीपासूनच राजकीय डावपेच आखले होते.
पालिकेवर यापूर्वी कधीही भाजपची सत्ता नव्हती. मात्र, यावेळी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करत पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. त्यामुळे आता महापौरही भाजपचाच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, महापौरपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. आरक्षण सोडतीत महिला राखीव पदासाठी तीन नगरसेविका त्यांच्या गटातील असल्याने गोरंट्याल यांचे पारडे जड मानले जात आहे.
महापालिकेत गोरंट्याल यांचा वरचष्मा
महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आणि महानगरप्रमुख भास्कर दानवे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. भास्कर दानवे, त्यांची पत्नी, तसेच कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी व मुलगा हे देखील निवडून आले आहेत.
मात्र आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये गोरंट्याल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या चार महिला नगरसेविकांपैकी एकीला महापौर बनविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. असे झाल्यास नगरपालिकेप्रमाणेच महापालिकेतही कैलास गोरंट्याल यांचाच वरचष्मा कायम राहणार आहे.
या आहेत महापौर पदाच्या दावेदार
महापौर पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने भाजपकडील चार महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये –
• रिमा खरात
• वंदना मगरे
• श्रद्धा साळवे
(कैलास गोरंट्याल गट)
आणि
• रुपा संजय कुरील
(दानवे गट)
यापैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याचा फैसला लवकरच होणार आहे.


