Manora Bandh News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मानोरा शहरात शोककळा; २९ जानेवारी रोजी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद.


मानोरा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे मानोरा शहरात शोकमय वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २९ जानेवारी रोजी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली.


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच बुधवारी मानोरा शहरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर व्यापारी बांधवांनी एकत्र येत गुरुवारी दुपारपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला मानोरा शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली.
दुपारपर्यंत संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत एकसंघतेचे दर्शन घडविले.


