Akola ganja seizure : अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत १८.३८ किलो गांजासह आरोपी ताब्यात. ५.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त.


अकोला : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी पोलीस ठाणे जुने शहर हद्दीत मोठी कारवाई करत एका इसमाकडून तब्बल १८ किलो ३८० ग्रॅम अंमली पदार्थ गांजा (अंदाजे किंमत ४.५७ लाख रुपये) जप्त केला आहे. या कारवाईत गांजा व दोन मोटरसायकली असा एकूण ५ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार २ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला–पातूर रोडवरील चांदूर फाटा परिसरात, अमनदीप हॉटेलच्या बाजूला काही व्यक्ती अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगून जात आहेत. या माहितीच्या आधारे शासकीय पंचासमक्ष सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत अनीस खान इमाम खान (वय ३८ वर्षे, रा. छबनमा नगर, खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून १८ किलो ३८० ग्रॅम गांजा (किंमत ४,५७,५०० रुपये) तसेच दोन मोटरसायकली (किंमत १,१०,००० रुपये) असा एकूण ५,६७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये कारवाई करून पुढील तपासासाठी त्यास पोलीस ठाणे जुने शहर, अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विक्रीसाठी आणला होता गांजा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अकोला–पातूर रोडवरील चांदूर फाटा परिसरात असलेल्या अमनदीप हॉटेलच्या बाजूला काही व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून होते. गोपनीय बातमीदाराच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पांडे तसेच पोलीस अंमलदार खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन, राजसिंह चंदेल, अभिषेक पाठक, आकाश मानकर, मोहम्मद आमीर, स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, स्वप्नील चौधरी व चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विनोद ठाकरे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, परिसरातील इतर गुन्हेगारी घटनांबाबत अधिक माहितीसाठी [Washim Crime: जमीन नावे करण्यासाठी लाच; ग्राम महसूल अधिकारी जाळ्यात] ही बातमीही वाचा.


