mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

गोवंश तस्करी उघड; मंगरूळपीरमध्ये साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त | Mangrulpir cow smuggling

शेअर करा :

Mangrulpir cow smuggling : मंगरूळपीर येथे कत्तलीसाठी नेले जात असलेले गोवंश पकडले. बोलेरो पिकअपसह साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक ताब्यात.

Mangrulpir cow smuggling

मंगरूळपीर : कत्तलीसाठी नेले जात असलेली गोवंशांची तस्करी मंगरूळपीर तालुक्यात उघडकीस आली असून, गोभक्तांनी सतर्कता दाखवत संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हवालदार नितीन रवणे यांच्या तक्रारीनुसार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी प्रथमेश सुळे (रा. काळे फाईल, वाशिम), ज्ञानेश्वर परांडे (रा. जांभरून परांडे), विनोद वानखेडे (रा. पंचशील नगर, वाशिम) व महेश इंगळे (रा. काळे फाईल, वाशिम) यांनी महामार्गावरील वनोजा टोलनाक्याजवळ संशयास्पदरीत्या जात असलेले बोलेरो पिकअप वाहन थांबवले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित वाहन व चालकास मंगरूळपीर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिस तपासात पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. एम.एच. ४९ बी.झेड. ५०५८) या वाहनातून गोवंशांची कत्तलीसाठी अकोला येथे वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी वाहनचालक रोशन रमेश सोनुने (वय ३६, रा. कामठी, नागपूर) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे.

वाहनाची सखोल तपासणी केली असता १० गोवंश जनावरे (अंदाजे किंमत १ लाख रुपये) तसेच बोलेरो पिकअप वाहन (किंमत सुमारे साडे तीन लाख रुपये) असा एकूण साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोणतीही वैद्यकीय व वाहतूक परवानगी नसताना, वाहन क्षमतेपेक्षा जास्त गोवंश कोंबून, उपाशी ठेवून व निर्दयतेने वाहतूक केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणी चालक व फरार साथीदाराविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वाशिम जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको