mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

रायपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात शेकडो महिलांचा जिल्हा परिषदेत एल्गार |Raipur water crisis Buldhana

शेअर करा :

Raipur water crisis Buldhana : महाजल व जलजीवन मिशनवर कोट्यवधी खर्च असूनही रायपूर गावात पाणीटंचाईचा कहर. अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात शेकडो महिलांनी जिल्हा परिषदेत धडक देत आंदोलन केले.

बुलढाणा : महाजल व जलजीवन मिशनसारख्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रायपूर गावातील

Raipur water crisis Buldhana

नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले असून, या प्रशासकीय अपयशाविरोधात शेकडो महिलांनी थेट जिल्हा परिषदेत धडक देत संताप व्यक्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्याने, आठवड्यातून एकदाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आक्रोश करत बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी शेकडो महिलांनी जिल्हा परिषद गाठली. महिलांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात जाऊन आपली व्यथा मांडली. पाण्यासाठी महिलांना दूरवर भटकंती करावी लागत असून, त्यामुळे घरगुती कामकाज, आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले.

Raipur water crisis Buldhana

महाजल व जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन, टाक्या व अन्य कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात असताना प्रत्यक्षात मात्र रायपूरच्या नळांमधून पाणी येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “जर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतील, तर पाणी कुठे गेले?” आणि “या योजना लोकांसाठी आहेत की कंत्राटदारांसाठी?” असे थेट सवाल महिलांनी उपस्थित केले.

यावेळी महिलांनी किमान आठ दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी ठाम मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही गावाला पाणी मिळत नसेल, तर हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, गावातील पाणीपुरवठा योजनेवर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले असूनही गेल्या तीन वर्षांपासून दोन ते तीन महिन्यांनीच पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पाण्यात किडे आढळत असल्याचेही सांगण्यात आले.

 

🔗 बुलढाणा जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या व ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

“आम्हाला एक ते दोन मैलांवरून पाणी आणावे लागते. टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे या योजनेचे विशेष ऑडिट करावे आणि आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा.”
— कस्तुराबाई समाधान जाधव, रायपूर

“दहा कोटी रुपयांहून अधिक खर्च करूनही गावाला दहा थेंब पाणी मिळाले नाही. पाहुणे आले तर दुसऱ्या गावातून पाणी आणावे लागते. परिस्थिती इतकी गंभीर आहे की आम्ही अंत्यविधी सोडून मोर्चा घेऊन आलो आहोत.”
— मो. फय्याज मो. एजाज, ग्रामस्थ, रायपूर

याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्पष्टीकरण देताना, रायपूर गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज देयक थकल्याने कनेक्शन कापण्यात आले असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य नसल्याने उपाययोजना करण्यात अडचणी येत असून, पाण्याच्या टाकीसाठी जागा न देणे व पाणीटंचाईसाठी प्रस्ताव न सादर करणे ही कारणेही विभागाने मांडली आहेत.

“ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.”
— अनिल चव्हाण, प्रभारी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

🔗 महाराष्ट्रातील इतर घडामोडी, आंदोलन आणि प्रशासकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको