mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

प्रकट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर 24 तास खुले | Sant Gajanan Maharaj Pragat Din Shegaon

शेअर करा :

Sant Gajanan Maharaj Pragat Din Shegaon : शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त 7 व 8 फेब्रुवारी रोजी मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले. लाखो भाविकांची गर्दी, भजनी दिंड्या व दर्शन व्यवस्थेची सविस्तर माहिती.

Sant Gajanan Maharaj Pragat Din Shegaon

शेगाव : “शेगावीचा राणा आम्ही डोळे भरून पाहतो, आम्ही गजाननामया भजनात नहातो” या ओवीप्रमाणे विदर्भाचे पंढरीनाथ म्हणून ओळख असलेल्या शेगाव नगरीत, श्री संत गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने प्रकट दिनानिमित्त 7 फेब्रुवारी व 8 फेब्रुवारी या दोन दिवशी श्रींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले राहणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे श्रींचा 148 वा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत धार्मिक परंपरेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारी रोजी मंदिरात श्री महारुद्रस्वाहाकार यागाचे पूजन करून प्रकट दिन उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर दररोज विविध क्षेत्रातून आलेल्या हरिभक्त परायणांच्या माध्यमातून कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे.

8 फेब्रुवारी रोजी श्रींचा 148 वा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 650 भजनी दिंड्या संतनगरी शेगाव येथे दाखल झाल्याची माहिती श्री संस्थानतर्फे देण्यात आली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शेगावमध्ये दाखल होणाऱ्या भजनी दिंड्यांचे ठिकठिकाणी श्री भक्तांकडून स्वागत करण्यात येत असून, प्रगट दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात महाप्रसादांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानतर्फे समाधी दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन, श्री महाप्रसाद, पारायण कक्ष व मंडप यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी 7 व 8 फेब्रुवारी या दोन दिवशी श्रींचे मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

👉 शेगाव, बुलढाणा व विदर्भ विभागातील इतर महत्त्वाच्या धार्मिक व स्थानिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

दर्शनासाठी दीड किलोमीटरची रांग

श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त संतनगरी शेगाव येथे हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आनंद सागर विसावा येथील स्कायवॉक पासून भाविकांची रांग शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनासाठी सोडण्यात येत आहे.
भाविकांच्या सेवेसाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी सेवेकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सेवेकऱ्यांकडून भाविकांना उत्तम सेवा प्रदान करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको