Nilgai accident in Jalna : जालन्यात देऊळगाव राजा रोडवरील वाघ्रूळ शिवारात वाहनांच्या धडकेत नीलगाय गंभीर जखमी झाली. पोलिस व वन विभाग उशिरा पोहोचल्याने संताप, गौरक्षकांच्या तत्परतेमुळे नीलगायचा जीव वाचला.


जालना : देऊळगाव राजा रोडवरील वाघ्रूळ शिवारात रविवारी रात्री दोन ते तीन अज्ञात वाहनांच्या धडकेत एक नीलगाय गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडली होती. मात्र या गंभीर घटनेनंतर पोलीस व वन विभाग तब्बल तीन तास घटनास्थळी न पोहोचल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील गौरक्षकांनी तातडीने ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळवले तसेच वन विभागालाही घटनेची माहिती दिली. मात्र वारंवार संपर्क साधूनही पोलीस व वन विभागाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, अपघातात नीलगायच्या जिभेवर व जबड्यावर गंभीर जखमा झाल्याने तिची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. वेळ न दवडता गौरक्षकांनी स्वतःच्या खर्चाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून घटनास्थळीच उपचार सुरू केले. डॉक्टरांनी जखमांवर टाके घातल्याने नीलगायचा जीव वाचू शकला.
यानंतर काही वेळाने वन विभागाचा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला. मात्र नीलगाय आकाराने मोठी असल्याने तिला हलवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. अखेर गौरक्षकांनीच पुढाकार घेत नीलगायला सुरक्षित ठिकाणी हलवले.
या संपूर्ण घटनेमुळे वन्यप्राणी अपघातासारख्या गंभीर प्रसंगी प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली असून, पोलीस व वन विभागाच्या बेजबाबदारपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
🔗 जालन्यासह मराठवाड्यातील अशाच इतर महत्त्वाच्या घडामोडी व अपघातांच्या बातम्या वाचण्यासाठी महाराष्ट्र विभागाला भेट द्या.


