mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

भोकरदनमध्ये अभियंत्याच्या घरावर पेट्रोल हल्ला; घटना CCTV मध्ये कैद | Bhokardan Engineer Petrol Attack Case

शेअर करा :

Bhokardan Engineer Petrol Attack Case : भोकरदन येथे शेख तालेब शेख रऊफ यांच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न. घटना CCTV मध्ये कैद; अनिल गावंडेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Bhokardan Engineer Petrol Attack Case

भोकरदन : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात एका अभियंत्याच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत जाळून टाकू,” अशी धमकी देत हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पहाटे १.५४ वाजता घडली घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख तालेब शेख रऊफ (रा. नाकोडानगर, भोकरदन) यांनी तक्रार दिली आहे. शेख हे व्यवसायाने अभियंता असून ते कुटुंबासह भोकरदन शहरात वास्तव्यास आहेत. मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी काही कामानिमित्त ते मध्य प्रदेशात गेले होते. सकाळी सुमारे ८ वाजता शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून घराच्या बाहेरील भागाला आग लागल्याची माहिती दिली.

घरी परतल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १० फेब्रुवारी रोजी पहाटे १.५४ वाजता दोन इसम बुलेटवरून तेथे आल्याचे दिसून आले. त्यातील अनिल गावंडे या ओळखीच्या व्यक्तीने घरासमोरील भागावर कॅनमधून पेट्रोल ओतून आग लावल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या आगीत घरासमोरील झाडांच्या कुंड्या, पायपुसणी आणि चपला जळून नुकसान झाले आहे.

Bhokardan Engineer Petrol Attack Case

जुन्या आर्थिक वादातून सूड?

या घटनेची पार्श्वभूमी जुन्या आर्थिक फसवणुकीच्या वादाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीनुसार, संशयित आरोपी अनिल गावंडे यांनी शेख तालेब यांच्या नावाचा वापर करून एका खासगी बँकेत बनावट खाते उघडले होते.

तसेच नगर परिषदेतील ठेकेदारीच्या कामाचा ११ लाख २१ हजार ३२८ रुपयांचा चेक परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या

सदर गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी शेख तालेब यांना वारंवार धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोर्टासमोर केस मागे घे, अन्यथा “तुला खतम करू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात शेख तालेब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार अर्ज दिला होता. मात्र, तरीही आरोपींनी धाडस करत घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी संशयित आरोपी अनिल गावंडे आणि त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.

भोकरदनमधील या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जुन्या आर्थिक वादातून थेट घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

🔗 👉 महाराष्ट्रातील इतर गुन्हेगारी घटनांबाबत वाचा – गुन्हे वार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको