Harshvardhan Sapkal case Pune : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; प्रकरणाचा तपास सुरू.


पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (वय ५१, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढा कॉलनी, सदाशिव पेठ) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वक्तव्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा दावा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असून त्यानुसार पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा नोंदविला.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे करत आहेत.
दरम्यान, संबंधित वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध भागांत आंदोलन केले. पुण्यात पतित पावन संघटनेच्या वतीने काँग्रेस भवनसमोर रविवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता


