Rajrajeshwar Temple Mahashivratri Akola : महाशिवरात्रीनिमित्त अकोला शहरासह जिल्ह्यातील शिव मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, पालखी सोहळा, भजन-कीर्तन आणि महाआरतीसह उत्सव भक्तीभावात साजरा; हजारो भाविकांची उपस्थिती.


अकोला : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अकोला शहरासह जिल्ह्यातील शिवालयांमध्ये रविवारी भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. शिवशंकराची स्तुतीस्तोत्रे, ‘ॐ नमः शिवाय’चा अखंड जप, रुद्राभिषेक, पालखी सोहळा, भजन-कीर्तन, प्रवचन आणि महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी ‘जय भोले’चा गजर करत भगवान महादेवाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त अकोल्याचे ग्रामदैवत असलेल्या जुने शहरातील प्राचीन श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेत बेलपत्र, फुले, हार व प्रसाद अर्पण करून राजराजेश्वराच्या पिंडीचे पूजन केले. उत्सवानिमित्त मंदिर परिसर नेत्रदीपक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता.


भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुने शहरातील मोठ्या पुलावरून जयहिंद चौकाकडे जाणारा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता, तर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी पायी मार्ग खुला ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात बेलपत्र, फुले, हार व धार्मिक साहित्य विक्रेत्यांची दुकानेही सजली होती.
जिल्हाभर ‘जय भोले’चा गजर
महाशिवरात्रीनिमित्त अकोला जिल्ह्यातील विविध शिव मंदिरांमध्येही भाविकांची मोठी गर्दी झाली. रणपिसे नगर येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिर, बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील महादेव मंदिर, तेल्हारा येथील गौतमेश्वर, वाडेगाव येथील जागेश्वर संस्थान, बार्शीटाकळीतील खोलेश्वर, सिंदखेड येथील मोरेश्वर मंदिर, मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर मंदिर तसेच तेल्हारा तालुक्यातील त्रिवेणी संगम वांगेश्वर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी उपस्थिती लावली.


नेत्रदीपक रोषणाईने शिवालये उजळली
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील अनेक मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध मंदिरांमध्ये भाविकांसाठी चहा, साबुदाणा उसळ यांसारख्या फराळाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शंभो… शंकरा…’च्या जयघोषात रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले.
श्री राजराजेश्वर पालखीची शहर परिक्रमा
शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराची पालखी सकाळी ११ वाजता मंदिरातून मार्गस्थ झाली. शहरातील विविध मार्गांवरून पालखीची परिक्रमा करण्यात आली. पालखी दर्शनासाठी मार्गावर भाविकांनी अलोट गर्दी केली होती. रात्री दहाच्या सुमारास पालखी मंदिरात परतल्यानंतर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता


