Narnala Festival Akola : अकोल्यातील नरनाळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘शिवशंभू गर्जना’ कार्यक्रम आणि इंडियन आयडल विजेता सलमान अली यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांनी महोत्सव रंगला.


अकोला : अकोल्यातील नरनाळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक, क्रीडा आणि संगीत कार्यक्रमांच्या बहारदार सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. ’शिवशंभू गर्जना’ या ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमापासून ते इंडियन आयडल विजेता सलमान अली यांच्या लाईव्ह कॉन्सर्टपर्यंत विविध कार्यक्रमांना रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत दुसरा दिवस संस्मरणीय ठरवला.


विविध उपक्रमांनी सुरुवात
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निसर्गाधारित पर्यटन उपक्रम, ‘मॅराथॉन – एक धाव संवर्धनासाठी’, चित्रकला स्पर्धा तसेच पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
🔗 अकोल्यातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी विदर्भ कॅटेगरीला भेट द्या…
‘शिवशंभू गर्जना’ने जागवला मराठी इतिहासाचा अभिमान
सायंकाळच्या सत्रात अभिजित व अमू जाधव यांच्या ‘शिवशंभू गर्जना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि मराठमोळ्या परंपरेची प्रभावी झलक सादर केली. वीररसपूर्ण गाणी, दमदार आवाज आणि प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये उत्साह व जोश संचारला.


प्रत्येक गाण्यावर हजारो रसिक उभे राहून टाळ्यांच्या गजरात गायकांच्या सुरात सूर मिसळत नाचत–गात होते. अभिजित जाधव यांच्या भारदस्त आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
🔗 राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र कॅटेगरीला भेट द्या…
या कार्यक्रमावेळी आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व कलावंतांचा गौरव करण्यात आला.


सलमान अलीच्या लाईव्ह कॉन्सर्टने रंगली संगीतमय मैफल
यानंतर इंडियन आयडल विजेता सलमान अली यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने महोत्सवाच्या वातावरणात रंगत आणली. अजय-अतुल यांच्या ‘देवा श्री गणेशा’ या गाण्याने त्यांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर ‘मेरे रश्के कमर’, ‘तेरी दिवानी’ तसेच जुनी व नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गाणी सादर करत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.


कार्यक्रमादरम्यान सलमान अली यांनी रसिकांमध्ये जाऊन सर्वांना गाण्यांमध्ये सहभागी करून घेतले. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही ठेका धरत या सुरेल मैफिलीचा आनंद लुटला. सुमधुर सुरावटींनी आसमंत निनादून गेला आणि उपस्थित रसिक संगीतमय वातावरणात न्हाऊन निघाले.
कैलास खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कवीसंमेलन, दुपारी २ वाजता इन्व्हेस्टर्स मीट आणि सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


