mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

वाशिममध्ये बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरण; ५८१ विद्यार्थी एकसारखी उत्तरे, २६ कर्मचारी निलंबित | Washim Board Exam Mass Copy Case

शेअर करा :

Washim Board Exam Mass Copy Case : वाशिम जिल्ह्यातील केंद्र क्रमांक ०९०६ येथे बारावी भौतिकशास्त्र परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा मोठा प्रकार उघडकीस आला. ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे आढळल्यानंतर शिक्षण विभागाने २६ कर्मचाऱ्यांना निलंबित करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

Washim Board Exam Mass Copy Case
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील केंद्र क्रमांक ०९०६, श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान सामुदायिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने मोठी कारवाई करत संबंधित २६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भरारी पथकाच्या तपासणीत प्रकार उघड

१६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता भरारी पथकाने परीक्षा केंद्राची अचानक पाहणी केली. केंद्रावर नोंदणीकृत ५८४ विद्यार्थ्यांपैकी ५८१ विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी शब्दशः एकसारखी उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले.

Washim Board Exam Mass Copy Case

प्रत्यक्ष पाहणीत परीक्षा केंद्रावर अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. दाटीवाटीची बसण्याची व्यवस्था, टिनशेडमध्ये परीक्षा सुरू असणे, अपुरी प्रकाशयोजना, पंख्यांची कमतरता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अपुरी संख्या तसेच वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. संपूर्ण केंद्रात केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याचेही समोर आले.

उत्तरपत्रिकांच्या नमुना तपासणीत बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे समान असल्याचे स्पष्ट झाले. काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन व पेन्सिलने खूणा केल्याचेही आढळले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही केंद्रास भेट दिली.

👉 अशाच कारवाईसंबंधित बातम्या वाचा…

मोबाईल जप्त, गैरप्रकाराची नोंद

तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊन केंद्रात फिरत असल्याचे आढळले. मोबाईल तपासणीस सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली; मात्र नंतर दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

भरारी पथकाच्या अहवालात ५८१ विद्यार्थ्यांनी सामुदायिक कॉपी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या सुविधा आणि जप्त मोबाईल यांच्या आधारे केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

👉 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा

२६ कर्मचारी निलंबित; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया

या प्रकरणानंतर शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करत २६ शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वाशिम जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली.

Washim Board Exam Mass Copy Case

दरम्यान, इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी केंद्राची तपासणी केली असता विद्यार्थ्यांच्या उत्तरांमध्ये समानता आढळून आली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा प्रस्ताव अमरावती बोर्डाकडे पाठवण्यात आला असून कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 ताज्या ब्रेकिंग न्यूजसाठी भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको