Bangladesh New Prime Minister Tarique Rahman : बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत नव्या सरकारची स्थापना केली. ५० सदस्यीय मंत्रिमंडळात ४१ नवीन चेहऱ्यांना संधी देत ‘जुलै चार्टर’ प्रस्ताव फेटाळण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली.


ढाका : बांगलादेशच्या राजकारणात मंगळवारी महत्त्वपूर्ण घडामोड घडत नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली. तब्बल २० वर्षांनंतर बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) पुन्हा सत्तेत आली असून पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
👉 जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
शपथविधी सोहळ्यासह ५० सदस्यीय मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली. या मंत्रिमंडळात ४१ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीला स्पष्ट बहुमत
१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने मोठे यश मिळवले. ३०० जागांपैकी पक्षाने २०९ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले, तर त्यांच्या मित्रपक्षांना ३ जागा मिळाल्या.
ढाका येथील राष्ट्रीय संसदेच्या साउथ प्लाझा येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात तारिक रहमान यांच्यासोबत २५ कॅबिनेट मंत्री आणि २४ राज्यमंत्री यांनीही शपथ घेतली. मंत्रिमंडळात तीन तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करून प्रशासनात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
👉 राजकीय घडामोडींच्या इतर बातम्या येथे वाचा
शपथ घेताच ‘जुलै चार्टर’ प्रस्ताव फेटाळला
सत्ता हाती घेतल्यानंतर तारिक रहमान यांनी अंतरिम सरकारने लोकशाही सुधारणांसाठी मांडलेला ‘जुलै चार्टर’ प्रस्ताव पूर्णपणे नाकारला. या चार्टरनुसार सर्व खासदारांना घटनात्मक सुधारणा परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घ्यावी लागणार होती. मात्र बीएनपीच्या खासदारांनी यास नकार दिला.
“आम्ही या कामासाठी निवडून आलेलो नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त करत बीएनपीने जनमत संग्रहाचा कौल मानण्यासही नकार दिला आहे. या निर्णयामुळे बांगलादेशातील लोकशाही सुधारणा प्रक्रियेच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


